सायझिंग उद्योजक औद्योगिक नळ जोडण्या घेणार
By Admin | Updated: July 14, 2017 23:39 IST2017-07-14T23:39:40+5:302017-07-14T23:39:40+5:30
सायझिंग उद्योजक औद्योगिक नळ जोडण्या घेणार

सायझिंग उद्योजक औद्योगिक नळ जोडण्या घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील सायझिंग उद्योजकांनी १५ आॅगस्टपर्यंत नळ पाण्याच्या औद्योगिक जोडण्या घ्याव्यात. तसेच त्यांच्याकडे असलेल्या कूपनलिकांना भूजल सर्वेक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी, अशा आशयाचा निर्णय शुक्रवारी नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
शहरामध्ये असलेल्या १५३ सायझिंग उद्योजकांना नगरपालिकेने नोटिसा पाठवून औद्योगिक नळाच्या जोडण्या घ्याव्यात. तसेच कूपनलिकांसाठी शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी घ्यावी, असे कळविले होते. तसेच सायझिंग कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा उल्लेखही या नोटिसांमध्ये केला होता. मात्र, सायझिंगमधून बाहेर पडणारे सांडपाणी प्रदूषण विरहित असते, अशी भूमिका घेऊन गुरुवारी (दि.१३) इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्यावतीने एकशिष्टमंडळ नगराध्यक्षा स्वामी यांना भेटले होते. असोसिएशनचे अध्यक्ष जयंत मराठे यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदनही दिले.
तेव्हा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक घेण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले होते.
बैठकीसाठी जलअभियंता सुरेश कमळे, बाजी कांबळे, सायझिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोद म्हेत्तर, आदींसह सायझिंग कारखानदार उपस्थित होते.