कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गासाठी बाजारभावापेक्षा सहापट दर आणि पन्नास टक्के बोनस द्यावा आणि आमच्या जमिनी कधीही घ्या, त्यासाठी एका पायावर तयार आहोत, अशी स्पष्ट भूमिका शनिवारी शक्तिपीठ समर्थक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेटून मांडली. यावेळी सुमारे ३५० सातबारे उतारे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले.जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. शक्तिपीठ समर्थक शेतकरी समितीचे अध्यक्ष प्रा. दौलत जाधव म्हणाले, चांगला भाव मिळाला तर जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी आहे. हे सांगण्यासाठी जिल्ह्यातील सर्व भागातून शेतकरी येथे आले आहेत. सहापट भाव आणि पन्नास टक्के बोनस दिला तर विरोधात असलेले शेतकरीही महामार्गासाठी जमीन देण्यासाठी पुढे येतील.
चारपट दर... २५% बोनसराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना चारपट दर आणि २५ टक्के बोनस देण्यापर्यंत चर्चा केली आहे. सरकार शेतकऱ्यांना चांगला भाव देईल.
लक्षवेधी घोषणा अन् नेत्यांचे फोटो..बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग नवा, शक्तिपीठ महामार्गाला गती, महाराष्ट्र राज्याची उन्नती, शेती, उद्योग, व्यवसायाला गती, व्यापार, पर्यटनाची जोडू नवी नाती, विकासाला गती द्या.. महामार्गाद्वारे शक्ती द्या असे फलक आणि हातात सातबारा घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.