सीपीआर आवारात सहा हजार लिटरची ऑक्सिजनची टाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:19 IST2021-06-05T04:19:14+5:302021-06-05T04:19:14+5:30
कोल्हापूर : सध्या शेंडा पार्क येथे अस्तित्वात असलेली सहा हजार लिटरची ऑक्सिजन टाकी सीपीआरमाध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. ...

सीपीआर आवारात सहा हजार लिटरची ऑक्सिजनची टाकी
कोल्हापूर : सध्या शेंडा पार्क येथे अस्तित्वात असलेली सहा हजार लिटरची ऑक्सिजन टाकी सीपीआरमाध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. याच आवारात रोज २०० जम्बो सिलिंडर्स क्षमतेचे तीन ऑक्सिजन जनरेशन प्लांटही उभारण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दुपारी सीपीआरला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तेव्हा राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी ही माहिती दिली.
मिरज येथे व्हॉल्व्हमधून गॅस गळती झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देसाई यांनी सीपीआरला भेट देऊन दक्षतेच्या सूचना दिल्या. महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील जागेत सहा हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी आहे. मात्र, सध्या या टाकीचा उपयोग होत नसून सीपीआर आवारात ही टाकी उभारल्यास ऑक्सिजनची साठवण क्षमता वाढणार आहे. म्हणूनच शुक्रवारी जेसीबीने या ठिकाणी खुदाई करण्यात येत असून, येत्या आठवड्यात ही टाकी या ठिकाणी बसवण्यात येणार आहे.
तिसऱ्या लाटेच्या शक्यतेचा विचार करता प्रवाही ऑक्सिजनवर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्थेचाही निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पाण्याच्या जुन्या टाकीच्या ठिकाणी, बंद असलेल्या पंप हाऊसच्या ठिकाणी आणि कोयना इमारतीजवळ तीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येणार आहेत. एका प्लांटमधून रोज २०० जम्बो सिलिंडर्स उपलब्ध होणार आहेत.
बैठकीला सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बरगे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. सुधीर सरवदे, डॉ. गिरीश कांबळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृष्टी
सीपीआर हे जिल्हा रुग्णालय असल्याने कोरोनाच्या निमित्ताने या ठिकाणी होणाऱ्या सुधारणा दर्जेदार करून घ्या. नंतरच्या कालावधीतही या सर्व सोयी-सुविधा जिल्ह्यातील रुग्णांना उपयुक्त ठरणार आहेत, अशा सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केल्या.
सीपीआरचे कौतुक
कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेतही सीपीआरने चांगली कामगिरी केल्याचे प्रशंसोद्गार जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. येथील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी हजारो रुग्णांना कोरोनामुक्त केल्याबद्दल त्यानी सर्वांचे अभिनंदन केले.