सहा साखर कारखाने विकणार
By Admin | Updated: October 19, 2014 00:41 IST2014-10-19T00:40:42+5:302014-10-19T00:41:48+5:30
राज्य बॅँकेची प्रक्रिया सुरू : सांगलीतील यशवंतराव चव्हाण सूतगिरणीचा समावेश

सहा साखर कारखाने विकणार
कोल्हापूर : राज्यातील सहा सहकारी साखर कारखाने व चार सहकारी सूतगिरण्यांच्या विक्रीची प्रक्रिया राज्य बॅँकेने सुरू केली आहे. याबाबत बॅँकेने ‘रिकन्स्ट्रक्शन आॅफ फायनान्शिअल असेट्स अॅँड एन्फोर्समेंट आॅफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अॅक्ट २००२’ अनुसार कर्जदार संस्थांच्या मालमत्ता विक्रीस काढली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संतनाथ सहकारी साखर कारखाना, सोलापूर; यशवंतराव चव्हाण सूतगिरणी, तुंग (ता. मिरज) व शारदा यंत्रमाग, सोलापूर या तीन संस्थांचा यात समावेश आहे.
तासगाव कारखाना विक्रीत झालेल्या गोंधळाविरोधात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी उपोषण केले होते. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्यांची विक्री न करता ते दीर्घ मुदतीने चालविण्यास देण्याची मागणी प्रा. पाटील यांनी केली होती. त्यानंतर येथून पुढे सहकारी साखर कारखान्यांची विक्री न करता चालविण्यास देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता; पण शासनाने घोषणा करून दोन महिने व्हायच्या आतच सहकारी कारखाने विक्रीस काढले होते. आता पुन्हा सहा सहकारी साखर कारखान्यांची विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य बॅँकेचे कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड यांनी सहा कारखाने व चार सूतगिरण्या लिलावात काढल्या आहेत. लिलावाची प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर संबंधितांनी कर्जाची रक्कम परतफेड केल्यास ही प्रक्रिया रद्द करण्यात येईल, असेही बॅँकेने म्हटले आहे.