सहा दिवसांचा जीवघेणा संघर्ष
By Admin | Updated: December 9, 2014 00:29 IST2014-12-09T00:04:47+5:302014-12-09T00:29:41+5:30
जंगलात वाट चुकलेल्या कडगावच्या महिलेची जिद्द

सहा दिवसांचा जीवघेणा संघर्ष
कडगाव : सभोवती घनदाट जंगल, हिंस्त्र प्राण्यांचा वावर, मुलांना भेटण्यासाठी रस्ता सापडेल या आशेने दिवसभर चालायचे, सायंकाळ झाली की पुन्हा झुडपात अथवा कड्याकपारीत जीव मुठीत घेवून कशीबशी रात्र ढकलायची, आपल्या चिमुरड्यांना भेटण्यासाठी अनवाणी आणि उपाशीपोटी तिने सलग पाच दिवस जीवघेणा संघर्ष केला. जगण्याची आस संपलेल्या सिल्वीयाला सहाव्या दिवशी गुराखी दिसला आणि जिवाच्या आकांताने तिने आरडाओरडा केल्यामुळे तिची जंगलातून सुटका झाली.
ही थरारक कहानी आहे कडगाव (ता. भुदरगड) येथील सिल्वीया झेविअर डिसोजा या ३६ वर्षीय महिलेची. संत फ्रान्सिस झेविअरच्या दर्शनासाठी कडगाव येथून सिल्वीया तिच्या पती आणि अन्य बांधवांबरोबर गोव्याला पायी निघाली होती. २९ नोव्हेंबरला डेळेमार्गे जंगलातून जाताना सिल्वीया वाट चुकली होती. सलग चार दिवस शोध घेवूनही न सापडल्याने सर्वजण हताश झाले होते.
दरम्यान, गवाणीच्या जंगलात वाट चुकलेली सिल्वीया चालत चालत आजरा, भुदरगड व सावंतवाडी या तीन तालुक्यांत पसरलेल्या गंगोत्रीच्या जंगलात पोहोचली. दिवस उगवला की घरी पोहोचण्यासाठी तिची पायपीट सुरु व्हायची. यावेळी तिच्याकडे फक्त पाण्याची बाटली होतीे. दररोज उपाशीपोटी, अनवाणी ४० ते ५० किलोमीटरची पायपीट करताना तिची दमछाक व्हायची, मात्र चिमुरड्यांच्या भेटीची आस तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे थकलेली पावले दुसऱ्या दिवशी पुन्हा 'जिकडे पुढा तिकडे मुलुख थोडा' करायची.
मनातून पुरती हरलेली सिल्वीया सहाव्या दिवशी पहाटे पठारावर बसलेली दिसून आली. यावेळी तिने एका गुराख्याला पाहिले आणि तिच्या आशा पल्लवीत झाल्या. जिवाच्या आकांताने तिने ‘वाचवा.. वाचवा..ऽऽ’ अशी आर्त विनवणी केली. त्यामुळे खोतवाडी येथील पांडुरंग वरगीकर यांनी वाडीतील अन्य लोकांच्या मदतीने तिला विष्णू खोत यांच्या घरी नेले. हे वृत्त कडगाव येथील लोकांना समजताच त्यांनी साखर वाटून, फटाका वाजवून आनंद व्यक्त केला. तब्बल सहा दिवसांनी घरी परतलेल्या सिल्वीयाने आपल्या चिमुरड्यांना कुशीत घेत डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. (वार्ताहर)
पाण्याचाच आधार
हिंस्त्र प्राण्यांची भीती आणि त्यातच गव्यांनी दिलेले दर्शन यामुळे ती मनातून पुरती खचली होती. अशावेळी ती झाडा-झुडपांचा आधार घेत असे. सलग चार दिवस केवळ पोटभर पाणी पिणारी सिल्वीया जगण्याची आस संपल्यामुळे पाचव्या दिवशी, तर पुरतीच सैरभैर झाली होती.