कोल्हापूर जिल्ह्यातील सहा धरणे भरली
By Admin | Updated: August 7, 2014 00:42 IST2014-08-07T00:36:35+5:302014-08-07T00:42:05+5:30
पाच धरणे भरण्याच्या मार्गावर : ११ रस्ते अद्याप बंदच, पावसाचा जोर ओसरला

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा धरणे भरली
कोल्हापूर : पुढील वर्षभरातील पिण्याच्या, तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्यानंतर आता पावसाचा जोर हळूहळू ओसरायला लागला आहे. दोन दिवसांपासून पावसाचा वेग मंदावल्याने नद्यांचे पाणीही कमी होत आहे. जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणे तुडुंब भरली असून, अन्य पाच धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ११ मार्ग अद्याप पाण्याखाली असून, त्या मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली आहे.
गेल्या १५-२० दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर होता. त्यामुळे नद्या, नाले, ओढे पात्राबाहेर पडून वाहत होते. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर ओसरत असल्याचे दिसत आहे. आज, बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत केवळ २८.२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमुख आगर मानल्या गेलेल्या गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १०३ मिलिमीटर पाऊस झाला, तर सर्वांत कमी शिरोळ तालुक्यात १० मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे (क्रमांक ३ व ६) अद्यापही उघडलेले आहेत. या धरणातून ४८०० क्युसेक्स पाणी दर सेकंदाला विसर्ग होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख राधानगरी धरणासह कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे ही धरणे यापूर्वीच भरून वाहत आहेत, तर सर्वांत मोठे धरण असलेल्या दूधगंगा (काळम्मावाडी) धरणासह वारणा, कासारी, कुंभी, पाटगाव ही धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. दूधगंगा ८१ टक्के, वारणा ९२ टक्के, कासारी ९६ टक्के भरले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात घट होत असली तरी जिल्ह्यात ११ रस्ते पाण्याखालीच आहेत. भोगावती नदीवरील खडक कोगे, सरकारी कोगे, राशिवडे, हळदी, शिरगाव, पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, तसेच कासारी नदीवरील यवलूज, ठाणे, आवळे, पुनाळ, तिरपण, वाळोली, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, मांगले, सावर्डे, कोडोली, चावरे, शिरगाव, खोची, दानोळी, वेदगंगा नदीवरील कुरणी, चिखली, बस्तवडे असे १८ बंधारे पाण्याखाली आहेत. (प्रतिनिधी)