मुरगुड वीज केंद्रासाठी चिमगाव येथील जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:51+5:302021-09-21T04:26:51+5:30
मुरगुड : मुरगुड शहर व परिसरातील ५४ गावांना लागणाऱ्या विजेसाठी ३३ केव्हीचे वीज केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी स्थापत्य ...

मुरगुड वीज केंद्रासाठी चिमगाव येथील जागेची पाहणी
मुरगुड : मुरगुड शहर व परिसरातील ५४ गावांना लागणाऱ्या विजेसाठी ३३ केव्हीचे वीज केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी स्थापत्य विभागाच्या पथकाने आज चिमगाव येथील चिमकाईदेवी परिसरातील शासकीय गायरानाच्या जागेची पाहणी केली आहे. त्यामुळे हे केंद्र लवकरच उभारणीचा मार्ग मोकळा होणार असल्याने ५४ गावांचा विजेच्या वापराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मुरगुड शहर व परिसरातील ५४ गावे मुरगुड विभागात येतात. या अंतर्गत औद्योगिक, कृषी,व्यापारी व घरगुती क्षेत्रातील हजारो वीज ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांना आवश्यक वीजपुरवठा मुदाळतिट्टा सबस्टेशन किंवा मुम्मेवाडी सबस्टेशनकडून घ्यावा लागत होता त्यात अनेकवेळा तांत्रिक अडचणी येऊन वीजपुरवठा होण्यात व्यत्यय येत होता. त्यामुळे मुरगुडला स्वतंत्र वीज केंद्र होण्याची गरज होती. ३३ केव्हीचे वीज केंद्र स्थापण्याचा वीज महावितरण कंपनी व ऊर्जा खात्याकडे प्रस्ताव प्रलंबित होता. खासदार संजय मंडलिक यांनी याचा पाठपुरावा केल्याने या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती.
या वीज केंद्रासाठी दीड एकर जागेची गरज आहे. त्यासाठी चिमगाव येथील चिमकाईदेवी परिसरातील शासकीय गायरानाच्या जागेची स्थापत्य विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. एम. थोरात, कनिष्ठ अभियंता एस. पी. दळवी, मुरगुड वीज वितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता महेश शेंडे, सहायक अभियंता पी. टी. पाटील यांनी पाहणी केली आहे.