अभूतपूर्व रूपात सखींना भेटली लावणी
By Admin | Updated: July 22, 2014 22:13 IST2014-07-22T21:57:05+5:302014-07-22T22:13:02+5:30
‘कलाधाम ग्रुप’ने राजलक्ष्मी लॉन्सवर सादर केलेला हा कलाविष्कार सुमारे चार तास रंगला.

अभूतपूर्व रूपात सखींना भेटली लावणी
सातारा : कडाडत्या ढोलकीच्या तालावर रंगणारी लावणी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी. ‘नुपूरनाद’ या आगळ््यावेगळ्या कार्यक्रमातून ही लावणी फलटणच्या सखींना अभूतपूर्व रूपात भेटली. ‘कलाधाम ग्रुप’ने राजलक्ष्मी लॉन्सवर सादर केलेला हा कलाविष्कार सुमारे चार तास रंगला.
शनिवारी (दि. १९) फलटणमधील सखींच्या भेटीला ही बहुरंगी लावणी आली, ती आजवर न भेटलेल्या रूपात. गण, गवळण, बतावणी आणि वग असा पारंपरिक बाज असला, तरी तो हाताळणाऱ्या सगळ््या महिला कलावंत होत्या. राजा-प्रधान या पारंपरिक पात्रांऐवजी मिसेस राजा आणि मिसेस प्रधान वगातून अवतरल्या. लावणीच्या परंपरेची माहिती देणारा हा कार्यक्रम मनोरंजक आणि बोधप्रद होता. लावणीच्या पूर्वेतिहासापासून आजच्या रूपापर्यंत सर्व काही सखींच्या पुढ्यात उभे राहिले.
लावणीचा उगम संतवाड््.मयात आढळतो. नंतरच्या काळात कलगी-तुरा आणि अन्य रूपांत लावणी प्रकटत गेली. खुलत गेली. लावणीत प्रत्येक टप्प्यावर बदल होत गेले. पेशवाईत, नंतर ब्रिटिश काळात अनेक शाहिरांनी लावणी कशी खुलवली, याची माहिती रंजक स्वरूपात देण्यात आली.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी सखींसमोर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात जयश्री आगवणे, सुनीता पाटील यांच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यामध्ये मेहजबीन सय्यद या चंदूकाका सराफ यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सुवर्ण नथीच्या मानकरी ठरल्या. सखी ब्यूटी पार्लरच्या वतीने भाग्यवान सखींना फेशियलची सुविधा मोफत देण्यात आली. (प्रतिनिधी)