बहिणींच्या आर्त हाकेला हात सरसावले
By Admin | Updated: August 12, 2014 00:42 IST2014-08-12T00:21:30+5:302014-08-12T00:42:07+5:30
‘लोकमत’च्या वृत्ताने हेरवाड येथील धामणे कुटुंबीयांना मदतीचा ओघ

बहिणींच्या आर्त हाकेला हात सरसावले
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील मुक्या बहिणींनी भावासाठी ‘लोकमत’मधून मारलेली आर्त हाक समाजातील अनेक बंधूंच्या काळजापर्यंत पोहोचल्याने अनेकांचे हात मदतीसाठी सरसावले. रोख रक्कम, धान्य रूपातील मदतीसह दानशूर व्यक्तींनी धीर दिल्याने मुक्या बोलातच या बहिणी अश्रू ढाळत दातृत्वापुढे नतमस्तक होत आहेत.
दारिद्र्याचे जीवन कंठत असलेले येथील जितेंद्र सर्जेराव धामणे यांचे आईवडिलांचे छत्र हरपल्याने दोन मुक्या बहिणींचा सांभाळ करीत असताना त्यांच्याही दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ते अंथरुणावर खिळून आहेत. याचे वास्तव लेखन रविवार (दि. १०) रोजीच्या अंकातून ‘अश्रू ढाळत मुक्या बहिणींची भावासाठी आर्त हाक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केल्याने समाजातील अनेकांचे हात या बहिणींच्या मदतीसाठी सरसावले. जिल्ह्याच्या विविध भागांतून ज्वारी, गहू, तांदूळ, तेल, साखर, कपडे यांसह रोख रक्कम दिली जात आहे. तसेच समाज या बहिणींना मानसिक आधार देत असल्याने या प्रेमाने धामणे परिवार भारावून जात आहे.
या कुटुंबावर आपत्ती कोसळल्याने कार्यकर्ते बंडू पाटील, आप्पासो जोंधळे हे पालकत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मदतीसाठी सुकुमार पाटील (दानोळी), उद्योगपती पी. वाय. पाटील-टाकवडेकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र काळे, अबूबकर बारगीर, बाबासो काडाप्पा-पाटील, शकील शेख, संतोषकुमार पाटील, दिलीप पाटील (कागले), मारुती चौगुले, विश्वास बालिघाटे, बंडू पाटील यांच्यासह अनेकांनी रोख रकमेसह धान्य, कपडे रूपाने मदत करून मानवतेचे दर्शन घडविले आहे.
नगरसेवकांचे असेही दातृत्व
कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ‘ईश्वर’ नामक ‘परमार’ व्यक्ती या कुटुंबासाठी धाऊनच आली. काल, रविवारी रात्री ते एकटेच आले. मला चार बहिणी असून ही पाचवी बहीण आहे. संकटाला धीराने तोंड देण्याचे व मी भाऊ म्हणून तुमच्याबरोबर आहे, असे सांगून उपचारासाठी त्यांनी दहा हजारांची मदत दिली. मात्र, फोटो काढण्यास नकार देऊन नावही प्रसिद्धीस त्यांनी विरोध केला.