खासगी वाहनांच्या एकरकमी करात वाढ

By Admin | Updated: July 16, 2017 00:57 IST2017-07-16T00:57:46+5:302017-07-16T00:57:46+5:30

मालवाहतूक वाहनांना वगळले : ‘प्रादेशिक परिवहन’कडून अंमलबजावणी सुरू, खरेदीवर करवाढीचा परिणाम नाही : पवार

Single vehicle tax increase of private vehicles | खासगी वाहनांच्या एकरकमी करात वाढ

खासगी वाहनांच्या एकरकमी करात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘जीएसटी’मुळे मूल्यवर्धित कर, जकात रद्द केल्यानंतर राज्याच्या होणाऱ्या महसुलाची होणारी संभाव्य हानी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमान्वये बसविल्या जाणाऱ्या मोटार वाहन करात वाढ करणे आवश्यक झाले होते. त्यानुसार राज्य शासनाने दुचाकी, तीनचाकी (खासगी), चारचाकी व विना मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर एकरकमी करात दोन टक्क्यांनी वाढ केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी शनिवारी दिली.
या करवाढीत मालवाहतूक करणारी वाहने वगळून खासगी वापरण्यात येणाऱ्या मोटारसायकल, तिचाकी व चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यात ज्यांच्या इंजिनची क्षमता ९९ सीसीपर्यंत अशा वाहनांवर किमान आठ टक्के एकरकमी कर होता. आता यात सुधारणा होऊन १५०० रुपये किंवा वाहनांच्या किमतीच्या १० टक्के वाढ केली आहे. ज्या वाहनांची क्षमता ९९ सीसीपेक्षा अधिक परंतु २९९ सीसीपर्यंत आहे, अशा वाहनांवर पूर्वी वाहनांच्या किमतीच्या नऊ टक्के एकरकमी कर होता. त्यात वाढ होऊन हा करही १५०० रुपये किमान किंवा वाहनांच्या किमतीच्या ११ टक्के इतका झाला आहे.
ज्या वाहनांची इंजिन क्षमता २९९ सीसीपेक्षा अधिक आहे, त्या वाहनांवर यापूर्वी वाहनांच्या किमतीच्या १० टक्के एकरकमी कर होता. त्यात वाढ होऊन किमान १५०० रुपये मर्यादेच्या अधीन राहून वाहनांच्या किमतीच्या १२ टक्के इतका केला आहे. यातही पेट्रोल, डिझेल, एलपीजी-सीएनजी असे तीन प्रकार करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे एकरकमी करात प्रत्येकी दोन टक्के वाढ केली आहे. या करवाढीचा परिणाम वाहन खरेदी करणाऱ्यांवर होणार नाही; कारण ‘जीएसटी’मुळे जकात, मूल्यवर्धित कर कमी झाले आहेत, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले .



त्यात पेट्रोलवर चालणारी वाहने आहेत. त्यामध्ये वाहनांची किंमत १० लाख रुपयांपर्यंत असेल तर वाहनाच्या किमतीच्या ११ टक्के, तर १० लाखांपेक्षा अधिक व २० लाखांपर्यंत आहे, अशा वाहनांवर वाहनांच्या किमतीच्या १२ टक्के एकरकमी कर आकारण्यात येणार आहे. २० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या वाहनांवर १३ टक्के इतकी आकारणी होणार आहे.
डिझेलवर चालणाऱ्या वाहनाची किंमत १० लाख असेल तर त्यावर १३, तर १० लाखांपेक्षा अधिक व २० लाखांपर्यंत असेल तर त्या वाहनांच्या किमतीच्या १४ टक्के आकारणी होणार आहे. त्याहून अधिक किंमत असेल तर वाहनांच्या किमतीच्या १५ टक्के एकरकमी कर आकारला जाणार आहे. एलपीजी किंवा सीएनजीसारख्या नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या ज्या वाहनांची किंमत १० लाखांपर्यंत आहे त्यांच्या किमतीच्या ७, तर १० लाखांपेक्षा अधिक व २० लाखांपर्यंत किमतीच्या वाहनांवर आठ टक्के कर आकारणी होणार आहे. वाहनांची किंमत २० लाखांहून अधिक आहे. त्या वाहनांवर नऊ टक्के एकरकमी कर आकारण्यात येणार आहे.



आता ‘लर्निंग’ लायसेन्स एका तासात
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना काढणाऱ्यांना तो केव्हा मिळणार याची वाट पाहावी लागणार नाही. आता हा परवाना परीक्षा दिल्यानंतर अवघ्या एका तासात नागरिकांच्या हाती पडणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी शनिवारी दिली.
शून्य प्रलंबित कामकाजांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित असणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये दुचाकी, चारचाकी चालविण्याचा शिकाऊ परवाना संगणकावर परीक्षा झाल्यानंतर तत्काळ एका तासात दिला जाणार आहे. याकरिता १० मिनिटांची संगणकावर परीक्षा आणि त्यानंतर ३५ मिनिटे ते एका तासात लर्निंग अर्थात शिकाऊ परवाना नागरिकांना हाती मिळणार आहे.
यापूर्वी शिकाऊ परवाना परीक्षा दिल्यानंतर कधी पाच दिवस, तर कधी दोन ते तीन आठवडे मिळण्यासाठी लागत होते. संगणक प्रणालीमुळे तत्काळ परवाने देणे शक्य होणार आहे. याशिवाय प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी अशाप्रकारे प्रथम कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये एका तासात परवाना देणे सुरू केले आहे. तेथे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता तो कोल्हापूर कार्यालयातही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ‘एक खिडकी’सारखी सोय या कार्यालयात केली जाणार आहे.
कोल्हापूर येथे अंमलबजावणी केल्यानंतर पुढील टप्प्यात सांगली, सातारा या दोन उपप्रादेशिक कार्यालयांत अशा पद्धतीने वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना नागरिकांना दिला जाणार आहे. याशिवाय वाहन चालविण्याचा पक्का परवानाही वाहन चालविण्याची चाचणी घेतल्यानंतर तीन दिवसांत पोस्टात वितरित केला जाणार आहे. याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित मोरे यांची समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

Web Title: Single vehicle tax increase of private vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.