एकच पार्थिव; दोनवेळा अग्निसंस्कार!-- स्मशानभूमीच्या मरणयातना...
By Admin | Updated: August 5, 2014 23:40 IST2014-08-05T21:29:57+5:302014-08-05T23:40:21+5:30
पावसाळ्यातील चित्र : बोरखळमध्ये स्मशानभूमीअभावी उघड्यावर विधी

एकच पार्थिव; दोनवेळा अग्निसंस्कार!-- स्मशानभूमीच्या मरणयातना...
सुनील साबळे == शिवथर-- सातारा तालुक्यातील बोरखळ हे सुमारे चार हजार लोकवस्तीचे गाव. गावात अनेक सोयीसुविधा झाल्या; पण वैकुंठाकडे जाणारी वाट मात्र अद्याप होईना. गावात असलेल्या राजकीय गटबाजीमुळे स्मशानभूमी उभी राहू शकली नाही. यामुळे नदीकाठी उघड्यावर पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर ते वाहून गेल्याच्याही घटना घडल्या. तर काही वेळेला अर्धवट जळालेल्या मृतदेहाला दुसऱ्यांदा अग्नी देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीअभावी मृत्यूनंतरही मरणयातना सोसाव्या लागण्याचे दुर्दैव बोरखळकरांच्या नशिबी आले आहे.
सातारा-लोणंद रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर बोरखळ गाव आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात गावात कुणी मयत झाले तर कृष्णा नदीकाठी उघड्यावर अग्निसंस्कार केला जातो. निसरडा रस्ता, चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य यामधून वाट काढत पार्थिव कृष्णा नदीकाठी न्यायचे म्हणजे महाकठीण काम. स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा आहे. गावात दोन्ही गट एकाच पक्षाचे आहेत, मात्र स्मशानभूमीचा विषय निघाला की विरोधाला तोंड फुटते.
मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाताना खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात. दोन गटांत राजकीय हेवेदावे असल्यामुळे ग्रामपंचायतीत ठराव होऊनही काम होऊ न देण्याचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. जागा नसल्यामुळे स्वत:च्या कार्यक्षेत्रातही फंडाची रक्कम टाकता येत नव्हती, असे बोलले जायचे. मात्र, आता स्मशानभूमीसाठी गावातील काही जण आपली जमीन देण्यासही तयार असल्याने राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.
गावातील स्मशानभूमीचा प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच स्मशानभूमीचे काम सुरू होणार असल्याने कित्येक वर्षांचा प्रश्न आता मिटणार आहे.
- माधुरी रसाळ, सरपंच
गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो. पावसाळ्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असतात. याचा गांभीर्याने विचार व्हावा.
- तुकाराम ननावरे, ग्रामस्थ
जनसुविधा फंडातून बोरखळ गावच्या स्मशानभूमीसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे.
- सतीश चव्हाण,
सदस्य, जिल्हा परिषद