सिंधुदुर्गची विजेतेपदाची हॅट्ट्रिक
By Admin | Updated: September 6, 2015 20:57 IST2015-09-06T20:57:21+5:302015-09-06T20:57:21+5:30
शालेय हॅण्डबॉल स्पर्धा : कोल्हापूर मनपा संघाची बाजी

सिंधुदुर्गची विजेतेपदाची हॅट्ट्रिक
बांदा : येथील खेमराज मेमोरियल प्रशाळेच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी १९ वर्षांखालील मुलींच्या गटात सिंधुदुर्ग संघाने विजय मिळवीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर मनपा, तर १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर मनपा संघाने बाजी मारली.
दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील २१ संघांनी सहभाग घेतला.
१९ वर्षांखालील मुलींचा अंतिम सामना अत्यंत चरुशीचा झाला. या सामन्यात सिंधुदुर्ग संघाने कोल्हापूर मनपा संघावर ६ विरुद्ध ४ गोलनी विजय मिळविला. या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत कोल्हापूर मनपाने रत्नागिरी संघाचा ९ विरुद्ध 0 गोलने एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सिंधुदुर्ग संघाने कोल्हापूर जिल्हा संघाचा ७ विरुद्ध ३ गोलनी पराभव केला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने रत्नागिरी संघाचा ४ विरुद्ध १ गोलनी पराभव केला.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूर मनपाने सांगली जिल्हा संघाचा २१ विरुद्ध १२ गोलनी पराभव केला. या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत सांगली जिल्हा संघाने सिंधुदुर्ग संघाचा १७ विरुध्द ९ गोलनी, तर सातारा संघाने कोल्हापूर मनपा संघाचा २३ विरुद्ध ८ गोलनी एकतर्फी पराभव केला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात सातारा संघाने सिंधुदुर्ग संघाचा ७ विरुद्ध ५ गोलनी पराभव केला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूर मनपा संघाने कोल्हापूर जिल्हा संघाचा २0 विरुध्द ९ गोलनी पराभव केला. या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने सांगली जिल्हा संघाचा १0 विरुद्ध ३ गोलनी पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य लढतीत सांगली मनपा संघाने कोल्हापूर मनपा संघाचा १५ विरुद्ध ६ गोलनी पराभव केला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात सांगली जिल्हा संघाने सांगली मनपा संघावर सहज विजय मिळविला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून संदीप पाटील, प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, राहुल तिवले, अमित कारेकर, प्रथमेश देवकर, संतोष पाटील, रणजित पाटील, आशिष पाटील, विवेक मिशाळ, सचिन पोवार, नीलेश साळोखे, नंदू नाईक, लक्ष्मण पावसकर, धुरी, रविदास शिरोडकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)