जयसिंगपूर, शिरोळमध्ये गणरायाचे साधेपणाने स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:26+5:302021-09-11T04:25:26+5:30
जयसिंगपूर / शिरोळ : जयसिंगपूर,शिरोळसह परिसरात गणरायाचे साधेपणाने स्वागत करण्यात आले. गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा ...

जयसिंगपूर, शिरोळमध्ये गणरायाचे साधेपणाने स्वागत
जयसिंगपूर / शिरोळ :
जयसिंगपूर,शिरोळसह परिसरात गणरायाचे साधेपणाने स्वागत करण्यात आले. गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात गणेश मूर्तीची स्थापना केली. पोलीस प्रशासन,नगरपालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला.
सकाळच्या सत्रात जयसिंगपूर शहरातील रेल्वे स्टेशनरोड,वाडीरोड,क्रांती चौक याठिकाणी तर शिरोळमध्ये शिवाजी चौक, संभाजी चौक, कचेरी परिसर,कुंभारगल्ली याठिकाणी गणेशमूर्ती नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात घरगुती तर सायंकाळच्या सत्रात सार्वजनिक मंडळाकडून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जयसिंगपूर पोलीस ठाण्याअंतर्गत १८० तर शिरोळ पोलीस ठाण्याअंतर्गत १४० मंडळांनी नोंदणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करीत सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर मूर्ती प्रतिष्ठापना करू नये,स्वच्छता, सामाजिक अंतर तसेच निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते. नागरिक व गणेश मंडळानीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व शिरोळचे दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो : जयसिंगपूर येथे शुक्रवारी गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. (छाया : सुभाष जाधव)