‘सतेज विरुद्ध महाडिक’ अशाच लढतीचे वारे
By Admin | Updated: November 20, 2015 00:18 IST2015-11-20T00:01:27+5:302015-11-20T00:18:16+5:30
विधान परिषदेचे रणांगण : पी. एन. उमेदवार असल्यास विरोधात कोण?

‘सतेज विरुद्ध महाडिक’ अशाच लढतीचे वारे
कोल्हापूर : विधान परिषदेसाठी कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध आमदार महादेवराव महाडिक यांच्यातच लढत होईल, अशी चिन्हे आज दिसत आहेत. काँग्रेसची उमेदवारी पी. एन. पाटील यांना मिळाल्यास निवडणूक बिनविरोध होणार, त्यांच्याविरोधात अन्य कुणी रिंगणात येणार की स्वरूप महाडिक बंडखोरी करून रिंगणात उतरणार, अशीही चर्चा सुरू आहे.
उमेदवारी कुणालाही मिळाली तरी जी काही झुंज होईल ती काँग्रेसमध्येच होईल; कारण भाजप व शिवसेनेची या मतदारसंघात मर्यादित मते असल्याने त्यांचा उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता फारच धूसर आहे. महाडिक व भाजप यांची राजकीय मैत्री जमली असल्याने भाजप त्यांच्या पाठीशी राहील. त्याशिवाय शिवसेनेतील आमदार चंद्रदीप नरके यांचे पाठबळही महाडिक यांनाच राहील. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सतेज पाटील, महाडिक, पी. एन. पाटील आणि प्रकाश आवाडे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. पक्षीय मतांचा एकगठ्ठा असल्याने या उमेदवारीस फारच महत्त्व आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य पातळीवर धोरण म्हणून काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन पक्षांसह जनसुराज्य शक्ती व काही अपक्षांचा पाठिंबा विचारात घेतल्यास ३४९ पैकी २७५ मतांचा गठ्ठा एका बाजूला होतो. ही सगळी मते एकटाकी पडत नाहीत; कारण त्यांची नेत्यांमध्ये व विविध गटांमध्ये विभागणी झालेली असते. त्याशिवाय आर्थिक ताकदीचाही मोठा प्रभाव असतो.
काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाल्यास आमदार महाडिक बंडखोरी करून रिंगणात उतरणार हे स्पष्टच आहे. स्वत: महाडिक यांनीही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेटीतही त्यांनी तसे सूतोवाच केले आहे. काहींच्या मते ते स्वत: थांबून स्वरूप महाडिक यांना रिंगणात लढवतील.
उमेदवारी जर पी. एन. यांना मिळाली तर मात्र महाडिक शब्द दिल्याप्रमाणे रिंगणातून बाजूला जाणार का, हीच खरी उत्सुकता आहे. पी. एन. यांना उमेदवारी द्या, माझी त्यास हरकत नसल्याचे ते वारंवार सांगत आहेत; परंतु मग ही लढत बिनविरोध होणार की राष्ट्रवादीतून कोण बंडखोरी करणार, याचाही कानोसा घेतला जात आहे. महाडिक थांबले व राष्ट्रवादीने मदतीचा शब्द पाळला तर मग लढत एकतर्फीच होईल; परंतु राजकारण कधीच इतके सोपे नसते. म्हणून तर एकमेकांची पाय खेचाखेची सध्या सुरू आहे.
पी.एन.-सतेज यांच्यात समेटासाठी प्रयत्न
जिल्हा काँग्रेसअंतर्गत पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्यात समेट घडवून आणण्यासाठीही प्रदेश पातळीवरील नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. या दोघांत सध्या तसा उघड राजकीय संघर्ष नसला तरी अंतर्गत वर्चस्वाचा वाद आहेच. त्यामध्ये पक्षाचे नुकसान होऊ नये. हे दोघे एकत्र राहिले तर पक्षाला मोठी ताकद मिळू शकते, या दृष्टीने या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मतदार असे :
जिल्हा परिषद : ६९
महापालिका : ८१
इचलकरंजी नगरपालिका : ५७
जयसिंगपूर नगरपालिका : २३
गडहिंग्लज, कागल, मुरगूड, पन्हाळा, मलकापूर, वडगाव आणि
कुरुंदवाड नगरपालिका प्रत्येकी १७ म्हणजे एकूण - ११९
स्वीकृत सदस्य
पंचायत समितीचे सभापती : १२
महापालिका व इचलकरंजी नगरपालिका प्रत्येकी : ०५
आठ नगरपालिकांचे प्र.दोन : १६
एकूण : ३८
एकूण मतदार ३८७ त्यातील ३८ स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार न मिळाल्यास ३४९.