कसबा तारळेतील रौप्यमहोत्सवी आषाढी दिंडी

By Admin | Updated: July 7, 2014 00:55 IST2014-07-07T00:54:36+5:302014-07-07T00:55:30+5:30

होईन भिकारी, पंढरीचा वारकरी

Silvermahotsavi Ashdhani Dindi of Kasba Tarale | कसबा तारळेतील रौप्यमहोत्सवी आषाढी दिंडी

कसबा तारळेतील रौप्यमहोत्सवी आषाढी दिंडी

रमेश साबळे ल्ल कसबा तारळे
होईन भिकारी, पंढरीचा वारकरी
हाचि माझा नेम धर्म।
अवघे विठोबाचे नाम।।
हेचि माझी उपासना।
लागे संताच्या चरणा।।
तुका म्हणे देवा।
करीन ती भोळी सेवा।।
या जगद्गुरू तुकोबारायांच्या संतवचनाप्रमाणे पस्तीस वर्षांपूर्वी इचलकरंजी येथील एक नामांकित यंत्रमागधारक कै. ह.भ.प. धोंडिराम भोजने हे कसबा तारळे येथे आले आणि अल्पावधीतच त्यांनी एक एक करत मोठ्या प्रमाणात गावातील लोकांना वारकरी सांप्रदायाची गोडी लावली. अनेकांना संतमार्ग दाखविला. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. म्हणूनच पंचवीस वर्षांपासून येथील वारकरी भक्तिभावाने माघ आणि आषाढी वारीसाठी पायी दिंडीने रवाना होतात.
येथील विठ्ठल मंदिर आज भव्यदिव्य अशा श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात रूपांतरित झाले आहे. आॅगस्ट (श्रावण) व जानेवारी (माघ) महिन्यातील हरिनाम सप्ताह येथील भागवत धर्माची व्याप्ती सांगतो. आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, भजन, प्रवचन, कीर्तन, आदी कार्यक्रमांत ग्रामस्थांबरोबरच परिसरातील भाविकही तल्लीन होतात. या काळात ग्रामस्थांचा दिवस सुरू होतो तो विठ्ठलाच्या काकड आरतीने, तर रात्र होते ती शेजारतीने.
आषाढी वारीसाठी येथील पायी दिंडीत वारकरी सहभागी होतात. यामध्ये महिलांची व युवकांची संख्याही लक्षणीय आहे. आळंदीपासून सुरू होणाऱ्या या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्यामागे तिसऱ्या क्रमांकाला या दिंडीचा मान आहे. आळंदीपासून पंढरपुरापर्यंत पालखी मार्गावर नोकरी-धंद्यानिमित्त असणारे भाविक या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करतात. गावातील ज्या वारकऱ्यांना काही कारणाने आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाता येत नाही, ते प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) या गावी पायी दिंडीने जाऊन विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. आषाढी वारीसाठी एकाच गावातून दोन पायी दिंड्या काढणारे जिल्ह्यातील एकमेव गाव असावे.
कसबा तारळेसह परिसरात वारकरी सांप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कै. ह.भ.प. धोंडिराम भोजने यांनी हजारो शिष्यगण निर्माण केले. यातील ह.भ.प. वसंत साबळे, ह.भ.प. सदाशिव पाटील, ह.भ.प. श्रीपती पाटील, ह.भ.प. मारुती दुर्गुळे, ह.भ.प. युवराज वागरे, ह.भ.प. प्रकाश आलंगदार, आदींनी प्रवचन व कीर्तनकार म्हणून लौकिक मिळविला आहे. आजही आपल्या गुरुंचा वसा आणि वारसा ते समर्थपणे सांभाळत भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.
आषाढी कार्तिकी हेचि आम्हा सुगी।
शोभा पांडुरंगी घनवटी।।
संताची दर्शने हेचि पीक जाण।
देता अलिंगन देह निवे।।
गावात आषाढी, कार्तिकी, माघ याबरोबरच महिन्याची वारी करणारे वारकरी
माघवारीला पंढरपूर पायी दिंडी, तर आषाढीसाठी आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी
सर्व जाती-धर्मांचे लोक वारकरी सांप्रदायामुळे एकत्र
दिवसागणिक वारकऱ्यांच्या संख्येत होतेय वाढ

Web Title: Silvermahotsavi Ashdhani Dindi of Kasba Tarale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.