दिवाळीच्या धामधुमीतही रौप्यनगरीत मंदीचे सावट
By Admin | Updated: October 14, 2014 23:26 IST2014-10-14T23:04:15+5:302014-10-14T23:26:34+5:30
चांदीच्या दरामध्ये घसरण : निवडणुकीच्या तपासणीमुळे दागिन्यांसह कच्च्या चांदीची वाहतूक थांबली

दिवाळीच्या धामधुमीतही रौप्यनगरीत मंदीचे सावट
तानाजी घोरपडे ल्ल हुपरी जागतिक बाजारपेठेमध्ये विविध कारणांनी निर्माण झालेली तीव्र स्वरूपाची मंदी तसेच औद्योगिक व नाणी उत्पादकांनी पूर्णपणे थांबविलेली चांदीची खरेदी यामुळे चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्ताबरोबरच वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याने चांदीच्या दागिन्यांची व कच्च्या चांदीचीही वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. या सर्व घडामोडींमुळे ऐन दिवाळीतच सर्वत्र मंदीचे वातावरण तयार झाले असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी ५० ते ५५ हजारांच्या घरात खेळत असणारा चांदीचा दर सध्या ३७ ते ३८ हजारांवर आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हाच दर ३५ हजारांच्या आतही येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आचारसंहितेच्या कालावधित संपूर्ण राज्यामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सर्वच वाहनांची कसून तपासणी केली जात असल्यामुळे चांदीचे दागिने देशभरातील बाजारपेठेवर पोहोचविण्याबरोबर दागिने निर्मितीसाठी आयात करावी लागणारी चांदीही परपेठेवरून वाहतूक करून आणणे धोक्याचे झाले आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याच्या पोलिसांच्या मानसिकतेमुळे एकही चांदी उद्योजक दागिन्यांची व चांदीची वाहतूक करण्याची ‘जोखीम’ पत्करण्याचे धाडस करीत नाही. दागिन्यांची व चांदीची वाहतूक ठप्प झाल्याने रौप्यनगरी हुपरीसह यळगूड, तळंदगे, पट्टणकोडोली, रणदेवीवाडी, सीमा भागाच्या गावांतील सर्वच व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण आहे. काही दिवसांवरच दिवाळी सण आला आहे.
या दिवसांमध्ये चांदीच्या दागिन्यांना देशभरातील सर्वच बाजर पेठांतून चांगली मागणी असते.
या मागणींची पूर्तता करण्यासाठी उद्योजक मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन दागिने तयार करण्यासाठी धडपडत असतात. असे यापूर्वीचे चित्र वर्षांनुवर्षे पाहावयास मिळत असे. मात्र,
यावेळी उलटे चित्र अनुभवण्यास मिळत आहे.
खरेदी-विक्री व्यवहारावर गंडांतर
गेल्या काही महिन्यांपासून जागतिक बाजारपेठेबरोबरच औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाणी उत्पादकांकडूनही चांदीच्या मागणीचा जोर ओसरण्याबरोबरेच केंद्र शासनाने वायदे बाजारातील सोन्या-चांदीच्या व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याने चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारावर गंडांतर आले आहे. परिणामी, सट्टेबाजांनीही या व्यवहारातून पळ काढला आहे. या सर्व घडामोडींचा विपरित परिणाम होऊन चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.