रौप्यनगरीत आनंदोत्सव
By Admin | Updated: July 31, 2015 22:49 IST2015-07-31T22:49:42+5:302015-07-31T22:49:42+5:30
नगरपालिकेला मंजुरी : सवाद्य मिरवणूक, गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी

रौप्यनगरीत आनंदोत्सव
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपरिषद स्थापन होऊन निमशहरी रौप्यनगरीचा सर्वांगीण विकास व्हावा अशी आस बाळगून गेल्या ४० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रौप्यनगरीवासीयांचे नगरपरिषदेचे स्वप्न अखेर गुरुवारी सत्यात उतरले. नगरपरिषदेची मंजुरी घेऊन आलेल्या आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांची शुक्रवारी सकाळी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी, ग्रामदैवत अंबाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत रौप्यनगरीवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, याप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनाची यावेळी सांगता करण्यात आली.हुपरी परिसरातील चांदी उद्योग, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीबरोबरच अनेक छोट्या- मोठ्या उद्योगांच्या उभारणीमुळे सध्या या गावची लोकसंख्या ५५ ते ६0 हजारांवर गेली आहे. ग्रामपंचायतीला इतक्या मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविणे अशक्य झाले आहे. परिणामी ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या नागरी सोयीसुुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी नगरपरिषदेची स्थापना व्हावी यासाठी सन १९७५ पूर्वीपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, शासनाने या मागणीकडे काही ठरावीक घटकांच्या विरोधामुळे दुर्लक्ष केले होते. बहुतांशी नागरिकांना व राजकीय पक्षांना नगरपरिषद पाहिजे आहे. मात्र, त्यांच्यामध्ये पुढाकार कोण घेणार यावरून मतभेद होत असत. परिणामी हुपरीतील पत्रकारांनीच पुढाकार घेऊन कृती समिती निर्माण केली व गेल्या तीन महिन्यांपासून शासन दरबारी प्रयत्न चालविले होते. राज्य शासनाच्या पावसाळी अधिवेशनास १३ जुलैपासून सुरुवात होताच विविध प्रकारच्या आंदोलनास शांततेच्या मार्गाने सुरुवात केली होती. कृती समितीचा रेटा व आमदार मिणचेकर आणि आ. सुरेश हाळवणकर यांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे शासनाला नगरपरिषदेस मान्यता देणे भाग पडले. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरीपत्रावर सही करून पत्र कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, संभाजी हांडे, सुदर्शन खाडे, बाळासाहेब रणदिवे आदींच्याकडे सुपूर्द केले. ही आनंदाची बातमी समजताच गुरुवारपासून रौप्यनगरीवासीय आनंदोत्सव साजरा करीत आहेत. शुक्रवारी सकाळी आमदार मिणचेकर व कृती समितीचे सदस्य पत्र घेऊन गावात येताच त्यांची जल्लोषी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, नानासाहेब गाठ, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, मंगलराव माळगे, सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच राजेंद्र सुतार, दौलतराव पाटील, आप्पासाहेब देसाई, पुंडलिक वाईगडे, रघुनाथ नलवडे उपस्थित होते.