आचारसंहितेचे पालन करून मूक आंदोलन यशस्वी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:44+5:302021-06-16T04:33:44+5:30
कोल्हापूर : आचारसंहिता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून एकजुटीने आज बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी होणारे मूक ...

आचारसंहितेचे पालन करून मूक आंदोलन यशस्वी करणार
कोल्हापूर : आचारसंहिता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून एकजुटीने आज बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी होणारे मूक आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील समन्वयकांनी मंगळवारी केला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण, समाधीस्थळी आणि दसरा चौक परिसरात लावलेले भगवे ध्वज, शहरातील प्रमुख चौकांमध्ये मागण्यांबाबतचे लावलेले डिजिटल फलक, अशी आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. समन्यवक, समाज बांधव-भगिनी असे सुमारे दोन हजार जण या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.
येथील समाधीस्थळी खासदार संभाजीराजे आणि मराठा समाजातील समन्वयकांची बैठक झाली. त्यात फत्तेसिंह सावंत, अजित राऊत, बाबा इंदुलकर, प्रा. जयंत पाटील, अनिल घाटगे, आदींनी आंदोलनाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. त्यात आचारसंहितेचे पालन, सोशल डिस्टन्सिंग, भूमिका मांडण्याबाबत लोकप्रतिनिधींचा क्रम, आदींचा समावेश होता. या सर्व समन्वयकांनी आचारसंहितेचे पालन करून मूक आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. यावेळी राजू सावंत, प्रसाद जाधव, सचिन तोडकर, चंद्रकांत पाटील, दिलीप सावंत, हर्षेल सुर्वे, किशोर घाटगे, प्रमोद पाटील, दुर्गेश लिंग्रस, लाला गायकवाड, संजय पवार, राजू लिंग्रस, सुनीता पाटील, गीता हसूरकर, राजू जाधव, जयकुमार शिंदे, सुरेश जरग आदी उपस्थित होते.
चौकट
एकजुटीने लढा देऊ या
मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने, विचाराने आरक्षणासाठी लढा देऊ या, असे आवाहन संयोगीताराजे छत्रपती यांनी केले. त्यांनी समन्वयकांना काही सूचनाही केल्या.
मागण्या अशा
१) ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, अनुदान द्यावे.
२) सारथी संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत.
३) अण्णासाहेब पाटील महामंडळातून राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा, सहकारी बँक, आदी वित्तीय संस्थातून कर्जपुरवठा करावा.
४) पंजाबराव देशमुख वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करावी.
५) आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी जागा निर्माण कराव्यात.
६) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी.