मोहिते, भोसले यांच्या मनोमीलनाचे संकेत

By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:28:59+5:302016-03-16T08:29:25+5:30

कार्यकर्त्यांमध्ये चर्चा : इस्लामपुरातील विवाह समारंभात आले एकत्र

Signs of Mohite, Bhosale's mores | मोहिते, भोसले यांच्या मनोमीलनाचे संकेत

मोहिते, भोसले यांच्या मनोमीलनाचे संकेत

बोरगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा सह. साखर कारखान्याच्या राजकारणातील नात्याने बंधू असलेले दोन धुरंधर योध्दे भविष्यकाळातील राजकारणात एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, इस्लामपूर येथील एका विवाह समारंभात या दोघांनी चक्क हस्तांदोलन करून चर्चा केली. हे पाहून येथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘कृष्णा’च्या भविष्यातील राजकाणातील मनोमीलनाची ही नांदी तर नसेल ना? अशीही चर्चा रंगली होती.
प्रेमात, युध्दात आणि आता राजकारणात कोण कोणाचा शत्रू नाही, असा युक्तिवाद नव्याने निर्माण होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. कृष्णा सह. साखर कारखान्याचे राजकारण सांगली आणि सातारा जिल्ह्याला परिचित आहे. यात जुना यशवंतराव मोहिते गट विरुध्द जयवंतराव भोसले गट होता. तोच वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहिते व डॉ. सुरेश भोसले यांनीही चालवला आहे. या दोन गटांचा संघर्ष अनेकवेळा सभासद व कार्यकर्त्यांनी पाहिला व अनुभवला आहे. या दोन बंधूंमधून विस्तवही जात नव्हता. मात्र या दोघा बंधूंतील प्रेम इस्लामपूरमधील एम. डी. पवार मंगल कार्यालयात एका लग्नसोहळ्यात अुनभवण्यास मिळाले. प्रथम ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले या लग्नसमारंभास उपस्थित झाले. त्यानंतर काही वेळाने माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते हे कार्यक्रमस्थळी आले. या दोघांच्या आसनामध्ये बरेच अंतर होते. लग्न लागल्यानंतर हे दोघे बंधू एकत्रितपणे वधू—वरांना आशीर्वाद देण्यासाठी पुढे आले. यावेळी त्यांचे कार्यकर्तेही आमने—सामने आले. प्रत्येकाच्या नजरा उंचावल्या. एकमेकांचे पक्के शत्रू आता एकमेकांना बगल देऊन जाणार, असे वाटत होते.
डॉ. सुरेश भोसले यांच्यासोबत कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील होते. जितेंद्र पाटील यांची चौकशी करुन, दोघांनी स्मितहास्य करुन हस्तांदोलन करून चर्चा केली. हे पाहिल्यानंतर उपस्थित हजारोजण आश्चर्यचकित झाले. भविष्यातील राजकारणात हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येऊन त्यांचे मनोमीलन होणार का? असेच प्रत्येकजण कुजबुजत होता. (वार्ताहर)


राजकारण, समाजकारण व कौटुंबिक सोहळे यात कधीही आम्ही राजकारण आणत नाही. कोणीही असा गैरसमज करुन घेऊ नये. शेवटी आम्ही एकाच कुटुंबातील बंधू आहोत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी व कौटुंबिक हितसंबंध एका ठिकाणी, अशा स्वरुपाचे राजकारण आम्ही करत आलो आहे. भविष्यात काय घडेल हे आताच सांगू शकत नाही.
डॉ. इंद्रजित मोहिते,
माजी अध्यक्ष, य. मो. कृष्णा कारखाना.

Web Title: Signs of Mohite, Bhosale's mores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.