गारगोटी-कोल्हापूर महामार्गाची चाळण; वाहनधारकांना नाहक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:45+5:302021-09-25T04:25:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : कोकणाशी जोडणाऱ्या कोल्हापूर-गारगोटी या महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची देखभाल करणाऱ्या ...

Sieving of Gargoti-Kolhapur Highway; Unnecessary inconvenience to vehicle owners | गारगोटी-कोल्हापूर महामार्गाची चाळण; वाहनधारकांना नाहक त्रास

गारगोटी-कोल्हापूर महामार्गाची चाळण; वाहनधारकांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी : कोकणाशी जोडणाऱ्या कोल्हापूर-गारगोटी या महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराने काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये मातीमिश्रीत मुरूम टाकून खड्डे बुजवले. सध्या पावसाची रिपरिप असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून गाळ निर्माण झाला आहे. या गाळामुळे एखाद्या वाहनाचे चाक खड्ड्यात गेले तर, खड्ड्यातील गाळ उडून समोरून येणाऱ्या वाहनधारकाच्या अंगावर जात आहे. प्रसंगी वाहनधारकांत वादावादी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने खड्डे बुजवण्यासाठी माती टाकली की मुरूम? असा प्रश्न प्रवाशांना खड्ड्यांची परिस्थिती पाहून पडत आहे. या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत असून अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. वाहनांची कामे निघत असल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

गारगोटी-कोल्हापूर या रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम २०१८ साली सुरू करण्यात आले असून या रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात आला. संबंधित ठेकेदाराने या रस्त्याची पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्याची अट आहे. परंतु ठेकेदाराकडून सध्या खड्डे बुजविण्याचा केवळ फार्स केला आहे.

कोल्हापूर - गारगोटी तसेच कोकणात जाण्या-येण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मडीलगे खुर्द बसस्थानकाशेजारी चौगले पेट्रोल पंपाजवळ तसेच मडीलगे ते कलनाकवाडीदरम्यान, मुधाळतिट्टा ते कासारवाडा यादरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे.

या रस्त्यावरून अनेक अधिकारी व प्रवासी, चाकरमानी प्रवास करतात. सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

फोटो ओळ

- मडीलगे खुर्द येथे चौगले पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे ( छाया - कैवल्य देसाई )

Web Title: Sieving of Gargoti-Kolhapur Highway; Unnecessary inconvenience to vehicle owners