मुरगूडमध्ये आजपासून घुमणार शड्डू
By Admin | Updated: January 21, 2015 23:58 IST2015-01-21T23:24:52+5:302015-01-21T23:58:43+5:30
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

मुरगूडमध्ये आजपासून घुमणार शड्डू
मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथे राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने व लाल आखाडा व्यायाम मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेला उद्या, गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. या आखाड्यामध्ये राज्यातील ५०० हून अधिक नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.मुरगूडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एस.टी. स्टँडच्या शेजारील पटांगणात या स्पर्धेचे आयोजन केले आहे. खुल्या गटासाठी बुलेट, प्लॅटिना मोटारसायकलसह रोख रक्कम व लाल आखाडा चषक, तसेच विविध १५ वजनी गटांसाठी मिळून पाच लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागी मल्लांची राहण्याची व जेवणाची सोय मोफत करण्यात आली आहे.
उद्या सायंकाळी चार वाजता या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते होणार असून, मॅट पूजन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ए. वाय. पाटील, सुधाकर साळोखे, मोहन गुजर, दिनकरराव कांबळे, नेताजी पाटील, वसंतराव शिंदे, आदी उपस्थित राहणार आहेत.शुक्रवारी (दि. २३) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजेत्या मल्लांचा सत्कार होणार आहे.शनिवारी (दि. २४) सर्व गटांतील अंतिम लढती होणार आहेत. त्याचबरोबर या दिवशी लाल आखाडा चषकासह सर्व गटांतील बक्षीस वितरण होणार आहे. यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शाहू कारखान्याचे संस्थाध्यक्ष विक्रमसिंह घाटगे, हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, आदी उपस्थित राहणार आहेत.
भव्य स्क्रीन व थेट प्रक्षेपणाची सोय
कुस्ती स्पर्धेला होणारी गर्दी लक्षात घेता संयोजकांनी यावेळी एस.टी. स्टँडच्या शेजारी भली मोठी स्क्रीन उभी केली आहे. कागल, राधानगरी, भुदरगड, आदी तालुक्यांत स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.