तासगावात लवकरच बेदाणा एक्स्पोर्ट झोन
By Admin | Updated: August 22, 2014 00:55 IST2014-08-22T00:38:24+5:302014-08-22T00:55:19+5:30
राधाकृष्ण विखे-पाटील : राज्यातील पहिलाच प्रकल्प

तासगावात लवकरच बेदाणा एक्स्पोर्ट झोन
तासगाव : तासगाव तालुक्यात द्राक्षशेती, बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तासगावात राज्यातील पहिल्या बेदाणा निर्यात विभागाची (एक्स्पोर्ट झोन) सुरुवात करणार असल्याची घोषणा कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (गुरुवारी) तासगावात केली. ‘अच्छे दिन आने वाले है’ म्हणणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारित शेतीमाल मार्केटचे भूमिपूजन आज विखे-पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील व पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
विखे-पाटील म्हणाले की, राज्यात शेतीमालाच्या निर्यातीची व्यवस्था अपेक्षेप्रमाणे नाही. एक्स्पोर्ट झोनसाठी शेतीमालाच्या उत्पादनात, गुणवत्तेत सातत्य असणे गरजेचे आहे. बेदाणा उत्पादन वाढते आहे. त्यांच्या किमतीही वाढत आहेत, ही आनंदाची बाब आहे. शेतीमालाला स्थैर्य मिळणे, चांगले दर मिळणे यासाठी आवश्यक सेवा-सुविधा गरजेच्या आहेत. तासगावात एक्स्पोर्ट झोन तयार करावा, ‘अपेडा’मार्फत पणन मंडळाच्यावतीने ५०-१०० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करू व पहिला एक्सपोर्ट झोन तासगावात तयार करू. त्यासाठी आवश्यक जमीन व अन्य मदत देऊ. आघाडी सरकार शेतकऱ्यांमागे राहिले आहे. शेतीमालाचे हमीभाव जाहीर केले आहेत. केंद्रात नवीन सरकार आले, मात्र त्यांच्याकडून कोणत्या शेतीमालाचे भाव वाढले? भांडवलदारांच्या उत्पादनाच्या किमती वाढत चालल्या, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या किमती तशाच आहेत.
गृहमंत्री पाटील म्हणाले की, जगातील बेदाण्याचे दर तासगावात ठरले पाहिजेत, यासाठी तासगावात एक्स्पोर्ट झोन तयार व्हावा. बेदाणा निर्यातीचे काम सुरू व्हावे. निर्यातीत केवळ टाटा, अंबानीच काम करू शकतात असे नाही, तर ते तासगावात सुरू करून दाखवून देऊ. तासगावचे मार्केट जागतिक दर्जाचे होऊ शकते. यासाठी पणन मंडळाकडून आवश्यक मार्गदर्शन व्हावे. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री सोपल, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक बाफना, एन. बी. म्हेत्रे आदींची भाषणे झाली.
मुख्यमंत्र्यांच्या अवमानाबद्दल नाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या अवमानाबाबत विखे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा सन्मान राहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
भरपावसात कार्यक्रम
सकाळपासून नसलेला पाऊस कोनशिला अनावरणावेळी सुरू झाला. संपूर्ण कार्यक्रम भर पावसात पार पडला.