तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा
By Admin | Updated: December 23, 2015 01:17 IST2015-12-23T00:56:40+5:302015-12-23T01:17:03+5:30
जादा दराची अपेक्षा : पहिल्याच टप्प्यात चार किलोच्या पेटीला २४० ते ४२५ रुपयांपर्यंत दर

तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा
दत्ता पाटील- तासगाव तालुक्यात यंदाच्या द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे. मणेराजुरी, डोंगरसोनी, आरवडेसह काही गावात द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे. पहिल्याच टप्प्यात चार किलोच्या पेटीला सरासरी २४० रुपयांपासून ४२५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. अद्याप देशभरात थंडीचा प्रभाव असल्यामुळे समाधानकारक दर नाही. मात्र आणखी काही दिवसांत दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तासगाव तालुक्यात द्राक्षबागेचे सरासरी सात हजार हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यात द्राक्ष हंगामाची सुरुवात डिसेंबर महिन्यापासून होते. त्यानंतर चार महिन्यांपर्यंत द्राक्षाचा हंगाम सुरू राहतो. तालुक्यात चार दिवसांपासून काही प्रमाणात द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. आॅक्टोबरपूर्वी पीक छाटणी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या द्राक्षांची विक्री सुरू झाली आहे. मुंबईसह तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये द्राक्षांची निर्यात होत असून, पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू झाल्यानंतर देशभरात द्राक्षाची निर्यात सुरू होणार आहे.
तालुक्यातील मणेराजुरी, डोंगरसोनी, आरवडे, सावर्डे या गावांत द्राक्षाची काढणी सुरू आहे. द्राक्षाचा हंगाम सुरू झाला असला तरी, सरासरीच्या तुलनेत अपेक्षित दर मिळाला नसल्याचे चित्र आहे. देशभरात अद्यापही थंडी जाणवत असल्यामुळे त्याचा परिणाम दरावर झाल्याचे मत द्राक्ष बागायतदारांनी व्यक्त केले. सध्याच्या दरात आणखी वाढ अपेक्षित असून, येत्या काही दिवसांत द्राक्षाला चांगला दर मिळेल, अशीही अपेक्षा द्राक्ष बागायतदारांना आहे.
पाणी टंचाईचे सावट
तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगामाची सुरुवात झाली असली तरी, बागायतदारांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. द्राक्षांची काढणी होईपर्यंत पाणी कमी पडून चालत नाही. मणेराजुरीसह बहुतांश गावांतील शेतकऱ्यांना उपसा सिंंचन योजना ठप्प असल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे. द्राक्षाचा हंगाम हातात आला असला तरी, पाणी टंचाईमुळे द्राक्ष बागायतदार चिंंतातूर असल्याचे चित्र आहे.
चार दिवसांपासून द्राक्ष काढणीस सुरुवात केली आहे. दहा एकर द्राक्षबागेचे एकूण क्षेत्र आहे. त्यापैकी ‘ब्लॅक ज्योती सिडलेस’ या जातीच्या द्राक्षांची काढणी सुरू आहे. ४२५ रुपयांनी द्राक्षांची विक्री केली आहे. हा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. मात्र लवकरच दर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा उर्वरित द्राक्ष विक्रीसाठी होईल, अशी अपेक्षा आहे.
- परशराम एरंडोले, द्राक्ष बागायतदार, मणेराजुरी, ता. तासगाव
तालुक्यात द्राक्ष हंगामाची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी द्राक्षे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीकडून परवाने सक्तीचे केले आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम बसावा, यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. तालुक्यात द्राक्षे खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना बाजार समिती परवाने देणार आहे. बागायतदारांनीही परवानाधारक व्यापाऱ्यांनाच द्राक्षांची विक्री करावी.
- अविनाश पाटील, सभापती, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.