आजरा तहसीलवर ‘श्रमुद’चा मोर्चा
By Admin | Updated: January 23, 2015 00:47 IST2015-01-22T22:57:49+5:302015-01-23T00:47:00+5:30
लाभार्थ्यांची चौकशी थांबवा : पेन्शन तीन हजार करा

आजरा तहसीलवर ‘श्रमुद’चा मोर्चा
आजरा : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आजरा तालुक्यातील विधवा, परित्यक्ता, निराधार महिला, अपंग व वृद्धांचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात बाजार मैदान येथून करण्यात आली. मोर्चा आजरा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार आता बदलले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नसणारी मंडळी सत्तेत आली आहेत. अशा मंडळींशी येथून पुढे लढा उभारावा लागणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न संघटितरीत्या मार्गी लावण्याची गरज आहे.एकीकडे लाखो कोटी रुपयांचे घोटाळे करणारे मंत्री समाजात खुलेआम वावरत असताना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राजीव गांधी वृद्धापकाळ योजनांच्या लाभार्थ्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला आहे. मुळातच या मंडळींना ६०० रुपये इतकी अत्यल्प पेन्शन दिली जात असताना ती वाढवून तीन हजार करण्यात यावी, अशी मागणी ‘श्रमुद’ची आहे. शेजारील कर्नाटक व गोवा राज्यांमध्ये ही पेन्शन जादा आहे.
अपंग व्यक्तीच्या प्रमाणपत्राचा प्रश्नही गंभीर आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी सुभाष दोरुगडे, संग्राम सावंत, निवृत्ती कांबळे, डॉ. नवनाथ शिंदे यांची भाषणे झाली. मोर्चाच्यावतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी दशरथ घुरे, नारायण भडांगे, मंगल कांबळे, कृष्णा सावंत, बाळू सावंत, तुकाराम सुतार, नागेश गुरव यांच्यासह ‘श्रमुद’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाच्या मागण्या
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना लाभार्थ्यांची चौकशी थांबवावी.
सर्व पेन्शन योजना तीन हजार प्रति महिना करावी.
अपंग व्यक्ती प्रमाणपत्र देण्याची गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था व्हावी.
रेणुका जाधव या महिलेच्या पेन्शनची चौकशी थांबवावी.