शताब्दी महोत्सवातून ताकद दाखवूया
By Admin | Updated: November 23, 2014 23:53 IST2014-11-23T23:27:54+5:302014-11-23T23:53:00+5:30
वसंत वाणी : शिक्षक संघाची महामंडळ सभा; शताब्दी महोत्सवाला पंतप्रधान येणार

शताब्दी महोत्सवातून ताकद दाखवूया
कोल्हापूर : शिक्षक संघाचा शताब्दी महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्याचे नियोजन असून, या कार्यक्रमातून राज्यातील शिक्षक संघाची ताकद दाखवून देऊया, असे आवाहन भाजपचे महासमन्वयक वसंत वाणी यांनी केले.
राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा आज, रविवारी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झाली, त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते संभाजीराव थोरात होते. शिक्षकच देशाचे खरे मार्गदर्शक असून देशभक्ती व समाजभक्तासाठी पिढी उभी करण्याचे काम त्यांच्यावर असल्याने शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, असेही वाणी यांनी सांगितले. गेले दीड तासांत माजी अध्यक्षांच्या नावाची खूप चर्चा झाली आहे, पुन्हा-पुन्हा नाव घेऊन माणसं मोठी होतात, याचे भान ठेवा.
सरकार बदलले असले तरी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार आहे. यासाठीच भगवानगड येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत २५ हजार शिक्षकांचे महामंडळ घेऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. त्याचबरोबर शिक्षक संघाच्या शताब्दी महोत्सव पुणे येथील बालेवाडी येथे अडीच लाख शिक्षकांच्या उपस्थितीत घेणार असल्याचे संभाजीराव थोरात यांनी सांगितले. मुख्यालयात राहण्याची सक्ती कोल्हापुरातील शिक्षकांना केली जाते, पण काळजी करू नका, कोणाचेही घरभाडे कपात केले जाणार नाही. प्रसंगी उपोषणाला बसू पण शिक्षकांच्या एका रुपयालाही हात लावू देणार नसल्याचे थोरात यांनी सांगितले.
मोहन भोसले, आप्पासाहेब कुल, अंबादास वाझे, जनार्दन निऊंगरे, एन. वाय. पाटील, विलास पाटील, अरुण चाळके, सुनील पाटील, बाळकृष्ण हळदकर, पी. ए. पाटील, शिवाजी खाडे, बाबूराव खोत, विष्णू काटकर आदी उपस्थित होते.
गुरुजींचे कान उपटले!
सभा उशिरा सुरू झाल्याने गुरुजींच्या नजरा जेवणाकडेच होत्या. भाषणे सुरू असतानाच निम्मे शिक्षक जेवणाच्या हॉलमध्ये होते. त्यामुळे संभाजीराव थोरात चांगलेच संतप्त झाले. आपल्या प्रश्नांसाठी तीन तास बसता येत नसेल तर काय बोलायचे? आपण सकाळपासून उपाशी असल्याचे सांगत, तुम्हीच जर अशी शिस्त बिघडवत असाल तर अपेक्षा कोणाकडून करायच्या, अशा शब्दात थोरातांनी गुरुजींचे कान उपटले.
शिक्षक बँकेवर प्रशासक नेमा
राज्यातील मुदत संपलेल्या शिक्षक बँका, पतसंस्थांचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमावे, अशी मागणी सहकारमंत्र्यांकडे करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
असे झाले ठराव
प्रशासकीय बदल्यांच्या शासननिर्णयातील त्रुटी दूर करण्यात याव्यात.
पटसंख्येचा विचार न करता इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सरसकट मुख्याध्यापकांची नेमणूक करावी
४४ टक्के सादिलवार तत्काळ द्यावा.
विषय शिक्षकांच्या नेमणुका करत असताना अट न घालता नेमणुका कराव्यात.
शिक्षकांच्या मुलांच्या उच्चशिक्षणात फी सवलत मिळावी.
आर.टी.ई कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात.