प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा
By Admin | Updated: November 22, 2015 00:33 IST2015-11-22T00:08:51+5:302015-11-22T00:33:12+5:30
इचलकरंजी नगरपालिका : इमारतीवर डिजिटल लावल्याचे प्रकरण

प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा
इचलकरंजी : येथील पालिकेच्या दवाखान्याकडील कर्मचारी राजू साहेब रजपुते यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने आयजीएम दवाखान्याच्या इमारतीवर डिजिटल फलक लावून पालिका इमारतीचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दवाखान्याचे प्रशासन अधिकारी नितीन बनगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आयजीएम दवाखान्याकडील कर्मचारी राजू रजपुते हे काल, शुक्रवारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते दवाखान्याच्या आवारातच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्ताने तयार केलेला डिजिटल फलक आयजीएम दवाखान्याच्या आवारात लावला होता. हा फलक लावताना पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती.
त्यामुळे पालिका इमारतीवर खासगी कार्यक्रमाचा फलक लावून विद्रुपीकरण झाले आहे. मात्र, हा फलक लावण्यास दवाखान्याच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मनाई करणे आवश्यक होते, म्हणून दवाखान्याचे प्रशासन अधिकारी बनगे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
शांतता क्षेत्रात स्पिकरही
४रजपुते यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आमदार हाळवणकर यांच्या हस्ते असताना या कार्यक्रमासाठी दवाखाना हे शांतता क्षेत्र असतानासुद्धा तेथे स्पिकर लावण्यात आला होता. या स्पिकरवरून काही नेतेमंडळींनी भाषणेसुद्धा केली. विशेष म्हणजे रजपुते यांच्या सुविद्य पत्नी रेखा रजपुते या नगरसेविका असल्यामुळेच या कार्यक्रमाला मोठे स्वरूप प्राप्त झाले असल्याची चर्चा दवाखान्याच्या परिसरात होती.
ंआणखी चौघांना कारणे दाखवा नोटीस
४नगरपालिका प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी
वॉर्ड निरीक्षक रवींद्र लोखंडे यांच्यासह चौघा कर्मचाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.