थेट पाईपलाईनप्रश्नी पुराव्यानिशी त्रुटी दाखवा
By Admin | Updated: May 31, 2017 00:57 IST2017-05-31T00:57:39+5:302017-05-31T00:57:39+5:30
आयुक्त : खुलासे असमाधानकारक आल्यास कारवाई

थेट पाईपलाईनप्रश्नी पुराव्यानिशी त्रुटी दाखवा
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील वादग्रस्त लोखंडी पुलाची चौकशी न करता त्याच्या जादा बिलाच्या प्रस्तावावर सही केल्याप्रकरणी उपायुक्त विजय खोराटे यांच्यासह चार अधिकाऱ्यांचा समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान, या योजनेतील त्रुटी पुराव्यानिशी दाखवून दिल्यास त्यांची निश्चितच चौकशी करून कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.थेट पाईपलाईन योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि निकृष्ट दर्जाचे काम या अनुषंगाने महापालिकेचने बजावलेल्या ‘शो कॉज’ नोटिसीला युनिटी सल्लागार कंपनीच्या व्यवस्थापकाने दिलेला लेखी खुलासा जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याकडे दिलेला आहे; पण अद्याप तो आयुक्तांकडे पोहोचलेला नाही. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, युनिटी सल्लागार कंपनीने यापूर्वीच ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील कामाचे जादा बिल आकारणी केल्याचे मान्य केले आहे. या योजनेतील आतापर्यंत सुमारे दहा टप्प्यांत एकूण १७० कोटी रुपयांची बिले देण्यात आलेली आहेत; पण ठिकपुर्ली येथील लोखंडी पुलाचा खर्च आणि आकारणी केलेले बिल यामध्ये सुमारे १ कोटी ४८ लाख रुपयांचे जादा बिल देण्यात आले आहे. मात्र हा प्रकार लवकर लक्षात आल्यामुळे महापालिकेचे यात आता तसे नुकसान होणार नाही. ही जादा दिलेली रक्कम पुढील बिलातून वजावट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या लोखंडी पुलाबाबत कोणतीही चौकशी न करता जादा बिलाच्या प्रस्तावावर सही केल्याबद्दल उपायुक्तविजय खोराटे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, शाखा अभियंता हेमंत गोंगाणे, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांना यापूर्वीच नोटीस बजावली होती. यांपैकी दोन अधिकाऱ्यांचे खुलासे आलेले आहेत; पण चौघांचे एकत्रित खुलासे पाहून ते समाधानकारक नसतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिली.
स्टील दराबाबत ठोस पुरावे द्या
या योजनेसाठी वापरणात येणाऱ्या स्टील (सळई)चा दर सल्लागार कंपनीने बाजारभावापेक्षा कितीतरी जादा अपेक्षित धरला आहे. त्याबाबत पुराव्यानिशी ठोस तक्रारी दिल्यास त्याबाबतही चौकशी करून कारवाई करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
गैरसमज दूर करु
थेट पाईपलाईन पाणी योजना ज्या मार्गावरून येते तेथील पाच गावांनी पाईपलाईन टाकण्यास विरोध केला आहे. त्यापैकी राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर या गावास मंगळवारी उपायुक्त विजय खोराटे यांनी अधिकाऱ्यासह भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यामुळे या ग्रामस्थांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.