पोर्ले तर्फ बोरगाव प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:44+5:302021-09-19T04:24:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिका सुरेखा रमेश राठोड व शिक्षक ...

पोर्ले तर्फ बोरगाव प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिका सुरेखा रमेश राठोड व शिक्षक जवाहरलाल म्हाबरी यांना पन्हाळा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कार्यालयीन व शैक्षणिक कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. शालेय शिक्षण समितीच्या वतीने शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने विस्तार अधिकारी यांच्या प्राथमिक चौकशी अहवालावरून पन्हाळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधितांना नोटीस बजावली.
पन्हाळा पश्चिम भागातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून १५५ विद्यार्थी व शिक्षक संख्या पाच आहे. येथील सुरेखा राठोड व जवाहरलाल म्हाबरी यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे पालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोर्ले तर्फ बोरगाव शाळेत शंभर टक्के शिक्षकांच्या उपस्थितीवरून वादाला तोंड फुटले. वरिष्ठांचा आदेश व शालेय शिक्षण समितीची आग्रही मागणीनुसार मुख्याध्यापिका शिवनंदा लहाने यांनी सर्व शिक्षकांना शंभर टक्के उपस्थिती राहून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा सूचना दिल्या. यावेळी प्रभारी मुख्याध्यापिकासह इतर दोन महिला शिक्षिकांनी सहमती दर्शवली. परंतु सुरेखा राठोड व जवाहरलाल म्हाबरी यांनी सहा. संचालक पुणे यांच्या पन्नास टक्के शिक्षक उपस्थिती हा आदेश पुढे करत शंभर टक्के उपस्थितीला विरोध केला. दोन -अडीच महिने हा प्रकार सुरु आहे .
चौकटः
शिक्षण समितीच्या सहकार्यातून व शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेत शंभर टक्के उपस्थित राहून गेले दोन अडीच महिने मी व इतर दोघी शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत आहोत, परंतु इतर दोघांनी पन्नास टक्के नियमाचा बागुलबुवा केला आहे, हे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांच्याबद्दल पालकांमध्ये तीव्र संताप आहे. संबंधितांकडून कार्यालयीन व शैक्षणिक कर्तव्याची पायपल्ली केली जात आहे. वरिष्ठांनी यात लक्ष द्यावे.
शिवनंदा लहाने, प्रभारी मुख्याध्यापिका
अन्यथा मोर्चा ...
" शाळेत पाच शिक्षक संख्या असून त्यापैकी तिघी महिला शिक्षिका शंभर टक्के उपस्थित राहून शिकवत असताना इतर दोघांना काय अडचण आहे. मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण ? अशा कामचुकार शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढू ."
रावसाहेब काटकर, अध्यक्ष,शालेय शिक्षण समिती