महापालिकेची ३८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:44+5:302021-05-07T04:25:44+5:30
कोल्हापूर : प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील ३८ शिक्षक आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली ...

महापालिकेची ३८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
कोल्हापूर : प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील ३८ शिक्षक आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. कोविडमध्ये अत्यावश्यक सेवा असतानाही प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी गैरहजर राहिले. त्यामुळे उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत विभागीय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वॉर रुम, अलगीकरण व विलगीकरण कक्ष या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था विभाग सुरू केला आहे. या विभागात अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. लसीकरण डाटा संकलन, स्वॅब डाटा संकलन,सर्वेक्षण, कोविड पॉझिटिव्ह नागरिकांची चौकशी, ॲन्टिजन टेस्ट डाटा संकलन, वॉर रुममार्फत शहरातील बेड उपलब्धतेची माहिती गरजू नागरिकांना देण्याचे काम त्यांना दिले आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील ३८ शिक्षक अत्यावश्यक सेवा असतानाही प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या शिक्षकांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या शिस्तभंगाची व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथ नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम २०२०मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये म्हणून उप-आयुक्त आडसुळ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. संबंधितानी या नोटिसीचा लेखी खुलासा २४ तासात देऊन नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर रहाण्याबाबत आदेश दिले आहेत.