कृतीतूनच कर्तृत्व दाखवेन
By Admin | Updated: August 8, 2014 00:37 IST2014-08-08T00:24:18+5:302014-08-08T00:37:56+5:30
अविनाश सुभेदार : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू

कृतीतूनच कर्तृत्व दाखवेन
कोल्हापूर : बोलण्यापेक्षा कृतीतूनच कर्तृत्व दाखवून देईन, येणाऱ्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील प्रश्न समजावून घेऊन काम केले जाईल. यात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, स्वच्छ पाणीपुरवठा यांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज, गुरुवारी येथे सांगितले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या ठिकाणी कोकण विभागीय जातपडताळणी समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी आज पदभार स्वीकारला. डॉ. सूर्यवंशी यांनी त्यांना पदाची सूत्रे दिली. यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या, तर सुभेदार यांचे स्वागत केले.
सुभेदार म्हणाले, रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्यासाठी ‘न्यू मॅनेजमेंट टेक्निक्स्’चा वापर करू, तीर्थक्षेत्र विकास, बचत गटांचे मार्केटिंग, आदी विषयांवरही काम केले जाईल. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या उपक्रमांना भेटी देऊन ते पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, १३ महिन्यांत जास्तीत जास्त उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या ठिकाणी जाऊ, तेथे कोल्हापूरचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, सदस्य अरुण इंगवले, प्रा. अर्जुन आबिटकर, अधिकारी दिनेश डोके, पी. बी. पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, शिक्षण सभापती महेश पाटील, आदी उपस्थित होते.