Should be considered by the BJP as a constituent party, otherwise we will fight independently | घटक पक्ष म्हणून भाजपने विचार करावा, अन्यथा स्वतंत्र लढणार
घटक पक्ष म्हणून भाजपने विचार करावा, अन्यथा स्वतंत्र लढणार

बांबवडे : मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा विकास निधी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघासाठी आणला असून, आघाडीचा घटक पक्ष म्हणून भाजपनेच विचार करावा. न केल्यास जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याची घोषणा करून माजी मंत्री विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पिशवी (ता. शाहूवाडी) येथे पिशवी जि. प. मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन व जनसुराज्य-काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी करणसिंह गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विनय कोरे म्हणाले की, व्यवसायातून ठेकेदार व नातेवाइकांचा विकास साधण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. आमदारकीच्या सत्तेचा वापर त्यांनी यासाठीच केला आहे. त्यांनी स्वत:च्या हिमतीवर एक तरी पाझर तलावाचे काम केल्याचे दाखवावे, मी राजकारण सोडून देईन. ते कार्यसम्राट आमदार नसून, उद्घाटन सम्राट असल्याची टीका विनय कोरे यांनी आमदार सत्यजित पाटील यांच्यावर केली.
यावेळी करणसिंह गायकवाड म्हणाले की, विद्यमान आमदार लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या भूलथापांना कोणी भुलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, बाजार समितीचे सभापती बाबा लाड, माजी उपसभापती महादेव पाटील, समाज कल्याण सभापती इशांत महापुरे, सुभाष इनामदार, दगडू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य अमर खोत, माजी सभापती पंडित नलवडे, एच. आर. जाधव, आदी उपस्थित होते.

सत्यजित पाटील यांच्यावर टीकेची झोड
या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वच वक्त्यांनी आमदार सत्यजित पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवून त्यांना लक्ष्य केल्याचे दिसून आले. शिवसेना-भाजप युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याने विनय कोरे यांनी बोलावलेल्या मेळाव्याची उस्तुकता होती.

Web Title: Should be considered by the BJP as a constituent party, otherwise we will fight independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.