चित्रपट महोत्सवात लघुपटांचा दिवस
By Admin | Updated: December 29, 2016 00:24 IST2016-12-29T00:24:48+5:302016-12-29T00:24:48+5:30
‘कि फ्फ’चा आज समारोप : ‘विक्रम गायकवाड’ यांना चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार

चित्रपट महोत्सवात लघुपटांचा दिवस
कोल्हापूर : कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आशय व्यक्त करीत तरुणाईच्या हातातील माध्यम असलेल्या ‘लघुपट’ विभागात विविध विषयांवरील कलाकृतींचे सादरीकरण हे बुधवारचे आकर्षण ठरले.
महाराष्ट्र शासन पुरस्कृत कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे राजर्षी शाहू स्मारक येथे दि. २२ डिसेंबरपासून सुरू असलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज, गुरुवारी समारोप होत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘ट्रॅक १४३’ या इराणी चित्रपटाने समारोप होईल.
सात दिवसांपासून सुरू असलेल्या महोत्सवात माय मराठी विभागात विविध आशय, विषय असलेल्या कलाकृतींचे सादरीकरण झाले. त्यामध्ये प्रकाश कुंटे यांचा ‘सायकल’, सुनील सुखटणकर, सुमित्रा भावे यांचा ‘कासव’, दासबाबू यांचा ‘ब्रेव्ह हार्ट’, गिरीश विश्वनाथ यांचा ‘व्हेनिला स्ट्रॉबेरी अॅँड चॉकलेट’, संदीप दंडवते यांचा ‘भॉऽऽ’, विजयदत्त यांचा ‘माचीवरला बुधा’, निवास मोरे यांचा ‘कावळा’ या सात चित्रपटांचा समावेश होता. माय मराठी विभागात प्रेक्षक पसंती पुरस्कारासह, ज्यूरी अवॉर्डही देण्यात येणार असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. महोत्सवात बुधवारी विविध लघुपट व माहितीपटांचे सादरीकरण झाले. अमोल कचरे, हरीश कुलकर्र्णी व संतोष शिरगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मेंढपाळ आणि मी’ या ३० मिनिटांच्या माहितीपटामधून मेंढपाळ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या राहणीमानावर भाष्य करण्यात आले. त्यानंतर क्रिकेट आणि संगीताबद्दल विशेष आवड असणाऱ्या दोन अंध मुलांची कथा सतीश मुंडा दिग्दर्शित ‘दृष्टी’ या माहितीपटातून उलगडली. त्यानंतर एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याची, त्याबद्दल विचार करण्याची दृष्टी आपण स्वत:च विकसित करीत असतो. त्याला आपले पूर्वसुरींचे अनुभव अथवा ऐकीव गोष्टी कारणीभूत असतात. अशाच कथानकाभोवती फिरणाऱ्या ‘याकूब’ या नायकाभोवती हा लघुपट फिरत राहतो. १३ मिनिटांचा हा लघुपट एका विशिष्ट वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या मनोवृत्तीला हादरे देतो. स्वप्निल राजशेखर दिग्दर्शित ‘सावट’, जयंत सोमलकर यांचा ‘इयत्ता’, सोनम सिंग यांचा ‘अभिसारिका’, स्नेहा सोनवणे यांचा ‘तिची कथा’, अभिजित खुमन यांचा ‘कल्पवृक्ष’, विशाल कुंडले यांचा ‘ओपिंगे बेथिंगो’ यांसह विविध लघुपटांचे सादर झाले.(प्रतिनिधी)
ज्येष्ठ साहित्यिक व राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर आधारित ‘जिप्सी’ या माहितीपटाचे बुधवारी विशेष प्रदर्शन करण्यात आले. त्याची निर्मिती युनिक अकॅ डमीने केली असून, दिग्दर्शन धनंजय भावलेकर यांचे आहे. मुळे यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा माहितीपट आकर्षण ठरला. अब्दुललाटसारख्या एका छोट्या खेडेगावापासून सुरू झालेला हा प्रवास जपान, रशिया, सीरिया, अमेरिका अशा देशविदेशांची सैर घडवून आणतो. हा थक्क करणारा प्रवास पाहून उपस्थित भारावले. प्रतिकूल परिस्थितीत निराश न होता संकटावर कशी मात करावी, असा सकारात्मक संदेश हा माहितीपट देतो.