दुकाने सकाळी सुरू, दुपारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST2021-04-07T04:24:00+5:302021-04-07T04:24:00+5:30

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रविवारी शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यात सरसकट सर्व दुकाने बंदचा आदेश ...

Shops open in the morning, closed in the afternoon | दुकाने सकाळी सुरू, दुपारी बंद

दुकाने सकाळी सुरू, दुपारी बंद

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रविवारी शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यात सरसकट सर्व दुकाने बंदचा आदेश आल्याने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सोमवारी त्याला जोरदार विरोध करत पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हा प्रशासनाला आम्ही दुकाने सुरूच ठेवणार, असा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यात आली. सकाळच्या टप्प्यात ग्राहकांचीही वर्दळ होती. त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी व पोलिसांच्यावतीने दुकाने बंद करा, असे आवाहन केल्यानंतरही दुकानदारांनी त्याला विरोध करत दुकाने सुरूच ठेवली. बारानंतर मात्र ग्राहकांची गर्दी कमी झाली. महाद्वार राेडवरील काही दुकाने व फेरीवाल्यांकडे मोजके ग्राहक येत होते. दुपारी तीननंतर मात्र व्यावसायिकांनी बंद ठेवत प्रशासनाला सहकार्य केले.

----

पोलीस अधीक्षकांशी चर्चेनंतर बंद

पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारच्या बैठकीत एक दिवसाचा वेळ द्या आपण या प्रश्नावर पर्याय काढू, असे आवाहन केले होते. मंगळवारी व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवल्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी पालकमंत्र्यांनी एक दिवसाचा वेळ मागितला होता. उद्या पालकमंत्री, मंत्रिमहोदय व प्रशासनाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ, तो सगळ्यांसाठी बंधनकारक असेल. तोपर्यंत दुकाने बंद ठेवा, असे आवाहन केले. त्यानुसार, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज, सर्व संलग्न संघटना व व्यापाऱ्यांनी बैठक घेतली. त्यात दुपारी तीननंतर अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून अन्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसे व्यावसायिकांना कळविण्यात आले. त्यामुळे दुपारी तीननंतर व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली.

---

महाद्वार, पापाची तिकटी पूर्ण क्षमतेने सुरू

सकाळपासूनच महाद्वार आणि पापाची तिकटी ही मध्यवर्ती बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू होती. येथे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, व्यावसायिकांनी त्यास नकार देत व्यवसाय सुरूच ठेवला. प्रशासनानेही बंदची सक्ती केली नाही. दुपारी तीननंतर मात्र दुकाने बंद ठेवली गेली. राजारामपुरी व शाहूपुरीत सकाळी दुकाने सुरू होती. पाेलिसांनी आवाहन केल्यानंतर काहीजणांनी दुकाने बंद ठेवली तर काही दुकाने अर्धे शटर ओढून सुरू होती.

--

कर्मचारी, पोलिसांशी वाद

पोलीस व महापालिकेचे कर्मचारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत असताना महाद्वार, राजारामपुरी व शाहूपुरीमध्ये त्यांना विरोध करण्यात आला. निर्णय रात्री आठ ते सकाळी सातपर्यंतचा आहे. मग आता दुकाने बंद करायची सक्ती का करताय, अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांना घेराव घालण्यात येत होता. काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले.

--

मागच्या लॉकडाऊनमध्ये आमच्यासारख्या रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांचे हाल झाले. आमच्या व्यवसायाची सरकार काळजी करणार नाही का, कोरोनाची काळजी घेऊन धंदा करायला परवानगी द्यायला पाहिजे नाही तर आमचं पोट कसं भरणार.

संजय गुरव (फेरीवाला)

--

लॉकडाऊन केले म्हणून घरफाळा, वीज बिल, पाणी बिल, टॅक्स भरणे चुकत नाही याचा विचार शासनाने केला पाहिजे. रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंदला आमचा नकार नाही पण सरसकट बंद करणे चुकीचे आहे.

प्रल्हाद बुरसे (व्यावसायिक)

--

फोटो फार्ईल स्वतंत्र

Web Title: Shops open in the morning, closed in the afternoon