खानापूर तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकला

By Admin | Updated: July 28, 2015 00:27 IST2015-07-28T00:23:04+5:302015-07-28T00:27:46+5:30

तीन ठिकाणी सत्तांतर : दोन ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात, नागेवाडीत संमिश्र

Shivsena's saffron flag in Khanapur taluka | खानापूर तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकला

खानापूर तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकला

विटा : खानापूर तालुक्यातील १३ पैकी ९ ग्रामपंचायतींवर आ. अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दोन ग्रामपंचायतीत कॉँग्रेसने सत्ता कायम राखली असून, नागेवाडी ग्रामपंचायतीत शिवसेना व कॉँग्रेसच्या संमिश्र गटाची सत्ता आली आहे. तसेच मेंगाणवाडी ग्रामपंचायत कॉँग्रेस व भाजपप्रणित स्थानिक विकास आघाडीच्या ताब्यात आली आहे. देविखिंडी व पोसेवाडीत कॉँग्रेसची सत्ता संपुष्टात आली असून, तेथे शिवसेनेने बाजी मारली आहे. खानापूरच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रणधीर टिंगरे विजयी झाले आहेत.खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी विटा येथील शासकीय गोदामात करण्यात आली. त्यावेळी निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या तेरा ग्रामपंचायतींच्या ११३ जागांपैकी १८ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, तर शेंडगेवाडी व भडकेवाडी येथे नामाप्र उमेदवार न मिळाल्याने या दोन्ही ग्रामपंचायतीत प्रत्येकी दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंगरूळ ग्रामपंचायतीत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसने ९ पैकी ६ जागा जिंंकून सत्ता कायम ठेवली. विरोधी पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
नागेवाडी येथे शिवसेनेचे हणमंतराव निकम व कॉँग्रेसचे सुबराव निकम यांच्यात युती झाली होती. त्यांच्या पॅनेलला शिवसेनेच्या बापूराव निकम यांच्या पॅनेलने कडवे आव्हान दिले. त्यात कॉँग्रेस-शिवसेनेला ११ पैकी ७, तर शिवसेनेचे बापूराव निकम यांच्या पॅनेलला ४ जागांवर विजय मिळाला.
माहुली ग्रामपंचायतीत कॉँग्रेसचे संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ११ पैकी ८ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली. विरोधी शिवसेना-राष्ट्रवादी पॅनेलला २, तर स्थानिक स्वराज पॅनेलला १ जागा मिळाली. पारे येथे सर्वच्या सर्व ११ जागा शिवसेनेला मिळाल्या. यापूर्वी ८ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तीन जागांसाठी निवडणूक झाली. खंबाळे (भा.) ग्रामपंचायतीत शिवसेनेने सत्ता कायम ठेवली असून, यापूर्वी ४ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ५ जागांवर विजय संपादन केला. देविखिंडी येथे कॉँग्रेसची सत्ता संपुष्टात आली असून, शिवसेनेने सर्वच्या सर्व ९ जागा जिंकून सत्तांतर केले आहे.
तांदळगाव ग्रामपंचायतीत शिवसेनेला ५, तर कॉँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. भिकवडी बुद्रुक येथे ९ पैकी ६ जागांवर शिवसेनेने बाजी मारली असून, उर्वरित ३ जागांवर कॉँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. मेंगाणवाडी ग्रामपंचायतीत कॉँग्रेस-भाजपप्रणित शिवशक्ती पॅनेलने ५ जागा जिंकून सत्तांतर केले आहे. दोन जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. भडकेवाडी ग्रामपंचायतीत ७ पैकी दोन जागा रिक्त राहिल्या असून, उर्वरित पाचपैकी ३ जागा सेनेला, तर २ जागा कॉँग्रेसला मिळाल्या आहेत. रेणावी ग्रामपंचायतीत ६ जागांवर शिवसेना, तर ३ जागांवर कॉँग्रेस विजयी झाली आहे. शेडगेवाडी येथे दोन जागा रिक्त राहिल्या असून, उर्वरित पाचपैकी तीन जागा शिवसेनेने, तर दोन जागा कॉँग्रेसने जिंकल्या आहेत. पोसेवाडी ग्रामपंचायतीत शिवसेनेने ७ पैकी ६ जागा जिंकून कॉँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. केवळ एक जागा कॉँग्रेसला मिळाली आहे. खानापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. १ च्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने विजय संपादन केला आहे.
सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी प्रचंड गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. तहसीलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया शांंततेत पार पडली. निकालाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. (वार्ताहर)

अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल
नागेवाडी ग्रामपंचायतीत शिवसेना व काँग्रेसच्या गटाला संमिश्र यश मिळाले
मेंगाणवाडीत काँग्रेस व भाजप युतीच्या स्थानिक विकास आघाडीला यश
देविखिंडी, पोसेवाडीत काँग्रेसची ात्ता संपुष्टात, या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा कब्जा
खानापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रणधीर टिंगरे विजयी
माहुली ग्रामपंचायतीत काँग्रेसला आठ जागा, तर शिवसेना-राष्ट्रवादी पॅनेलला दोन जागा
मंगरूळ ग्रामपंचायतीत काँग्रेसने सहा जागा जिंकत सत्ता अबाधित राखली
खंबाळे ग्रामपंचायीत शिवसेनेने सत्ता कायम राखताना एकतर्फी विजय मिळविला
रेणावीत सहा जागा शिवसेनेला, तर दोन जागांवर काँग्रेस विजयी

Web Title: Shivsena's saffron flag in Khanapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.