शिवसेनेचा कल भाजपकडे
By Admin | Updated: March 20, 2017 00:59 IST2017-03-20T00:59:16+5:302017-03-20T00:59:16+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न; उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवड

शिवसेनेचा कल भाजपकडे
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सत्तासंघर्षात शिवसेनेच्या बहुतांश सदस्यांचा कल भाजपकडे असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपचे पारडे जड वाटत असले तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न पाहता सत्तेचा लंबक दोलायमान अवस्थेतच आहे. भाजता आणि दोन्ही कॉँग्रेसदरम्यान जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीचा संघर्ष २३ फेब्रुवारीपासून सुरू आहे. शिवसेनेला १० जागा मिळाल्यामुळे त्यांच्या भूमिकेला कमालीचे महत्त्व आले; परंतु ‘मातोश्री’चा स्वतंत्र आदेश येणार नसल्याचे स्पष्ट असल्याने शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या पुढच्या विधानसभेचा विचार करून आपापल्या भूमिका घेतल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
सायंकाळी रेसिडेन्सी क्लबवर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, शिवसेनेचे नेते संजयबाबा घाटगे, आदींनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य अंबरीश घाटगे हेदेखील होते. हे सर्वजण चर्चा करून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ताराराणी आघाडीचे अध्यक्ष
स्वरूप महाडिक हेही ‘रेसिडन्सी’वर दाखल झाले.
गेल्या दोन दिवसांमध्ये महाडिक थेट या मैदानामध्ये उतरल्याने या सत्तासंघर्षातील काही मोहऱ्यांनी आपली भूमिका भाजपला पूरक अशी घेण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. (पान ८ वर)
आवाडे आमच्यासोबत
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा निरोप प्रकाश आवाडे यांना दिला आहे. त्यामुळे आवाडे पक्षासोबतच राहतील, असा विश्वास निरीक्षक माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला आहे. मी आणि मुश्रीफ यांनी आवाडे यांच्याशी चर्चा केली असून, ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अध्यक्ष आमचाच : चंद्रकांतदादा
काहीही झाले तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सत्ता बनविण्यासाठी मुंबईहून कोल्हापूरला आलो आहे, असे सांगत पाटील यांनी आपला आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.