शिवसेनेवर टीका करणार नाही
By Admin | Updated: October 5, 2014 23:41 IST2014-10-05T23:39:57+5:302014-10-05T23:41:22+5:30
नरेंद्र मोदी : तासगावात सभा, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर

शिवसेनेवर टीका करणार नाही
सांगली : महाराष्ट्रापुढील समस्यांचे कारण युती-आघाड्यांचे सरकार हेच असून, युतीच्या चक्रातून राज्याला सोडवा आणि भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन करत बाळासाहेब ठाकरेंप्रती आदर आणि श्रद्धा असल्यानेच त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेवर काहीही बोलणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. शरद पवारांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये, त्यांच्यात शिवरायांचे गुण येणे अशक्य आहे, असा हल्लाही मोदी यांनी चढवला.
तासगाव येथील भाजपच्या प्रचारसभेत ते बोलत होते. बाळासाहेबांनी अनेक अडचणींवर मात करत शिवसेना वाढवली. त्यांच्याबद्दल आदर असल्यानेच शिवसेनेवर काहीही न बोलणे हे माझे कर्तव्य आहे, असे सांगत मोदींनी महायुती तुटल्यानंतर शिवसेनेकडे जाणारी सहानुभूती वळवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या तासगावात मोदींनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांच्या घड्याळातील काटे हललेले नाहीत, हे महाराष्ट्राचे भविष्य कसे ठरवणार? पवारांना इतिहासाचे ज्ञान नाही. मोदी म्हणाले, मुंबईच्या विमानतळाला आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वाजपेयी सरकारनेच दिले आहे. आम्ही सूरतमध्ये बारामतीपेक्षा मोठा शिवरायांचा पुतळा उभा केला आहे. त्यामुळे पवारांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये. ते अनेक वर्षे मुख्यमंत्री होते, नंतर केंद्रीय कृषीमंत्री होते. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन पवारांनी जलसंवर्धन केले असते, तर शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ आली नसती. साखर कारखान्यांना त्यांनी राजकारणाचा अड्डा बनविला आहे. गुजरात हा आजही महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. महाराष्ट्राला नर्मदा प्रकल्पातून चार हजार कोटींची वीज गुजरात देणार आहे. शीतपेयांमध्ये केवळ पाच टक्के फळांचा रस घातला, तरी भारतातील फळ उत्पादकांना मोठा फायदा होईल. तशी विनंती अमेरिकेतील शीतपेय कंपन्यांना केली आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत त्यावर संशोधन करण्याची ग्वाही त्या कंपन्यांनी दिली आहे. जपानने भारतात दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)
आर. आर. पाटील यांना
अडकवून ठेवण्याची खेळी
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील राज्यभरात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी फिरत आहेत. मात्र त्यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी भाजपने नरेंद्र मोदी यांची सभा तासगावात ठेवली. खासदार संजय पाटील यांनी मोदींच्या या सभेसाठी आग्रह केल्यानंतर ऐनवेळी सभेचे नियोजन करण्यात आले.
गृहमंत्री पाटील अपयशी
तासगावचे पार्सल मुंबईमध्ये फेल झाले आहे. ते तासगावमध्येच ठेवून घ्या. हा बोलका पोपट मुंबईला पाठवू नका. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना शंभरपैकी ९१ जणांना शिक्षा होत होती. मात्र यांच्या काळात शंभरपैकी ५५ जण सुटतात. पोपटपंची करणारे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आर. आर. पाटील यांच्यावर केली.