हिंगणगावात शिवसैनिकांचा धिंगाणा

By Admin | Updated: May 29, 2015 00:18 IST2015-05-29T00:12:21+5:302015-05-29T00:18:37+5:30

तोडफोड : दिनकर पाटील समर्थकांचा शिंत्रेंच्या घरावर हल्ला

Shivsainik's horn in Hingangaga | हिंगणगावात शिवसैनिकांचा धिंगाणा

हिंगणगावात शिवसैनिकांचा धिंगाणा

कवठेमहांकाळ : शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील आणि वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे यांच्या समर्थकांतील हाणामारीचे सत्र अजूनही सुरूच आहे. मंगळवारी शिंत्रे समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बुधवारी मध्यरात्री पाटील समर्थकांनी शिंत्रे यांच्या हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील घरावर हल्ला केला व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तसेच घरातील किमती साहित्यही फोडून टाकले.
या हल्ल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील, मल्हारी गेंड, अर्जुन गेंड, विजय गेंड यांच्यासह तीस ते चाळीसजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पुष्पा सुभाष शिंत्रे यांनी दिली आहे. दिनकर पाटील आणि शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वैर आहे. त्याचे पर्यवसान हाणामाऱ्यांमध्ये होत आहे.
मंगळवारी मध्यरात्री संदीप शिंत्रे यांचा चुलत भाऊ अमित शिंत्रे, सागर जाधव यांच्यासह तीस ते चाळीस समर्थकांनी विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे हाणामारी केली होती. अनेक मोटारी तसेच पंधरा ते वीस दुचाकींवरून गेलेल्या या जमावाने मल्हारी गेंड यांच्या बंगल्यावर व मोटारीवरही दगडफेक करून नुकसान केले होते. तेथील सामाजिक सभागृहावरही तुफान दगडफेक केली होती. शिंत्रे समर्थकांनी केलेल्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बुधवारी मध्यरात्री दिनकर पाटील समर्थकांनी शिंत्रे यांच्या घरावर हल्ला केला. यामध्ये शिंत्रे यांची आई पुष्पा, वडील शशिकांत, चुलते सुभाष यांना मारहाण केली. घरातील टी.व्ही., कपाट, दुचाकीसह किमती साहित्य फोडून टाकले. याबाबतची फिर्याद संदीप शिंत्रे यांची आई पुष्पा यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
यानंतर पोलिसांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील, मल्हारी गेंड, अर्जुन गेंड, विजय गेंड यांच्यासह तीस ते चाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस फौजदार जयसिंगराव पवार अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Shivsainik's horn in Hingangaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.