मराठी सेंटरच्या जवानांकडून शिवरायांचा जयघोष
By Admin | Updated: February 20, 2015 00:01 IST2015-02-19T23:59:46+5:302015-02-20T00:01:17+5:30
मराठा सेंटरचे ब्रिगेडीयर संतोष कुरूप यांनी शानदार समारंभात अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला.

मराठी सेंटरच्या जवानांकडून शिवरायांचा जयघोष
बेळगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ३८५ वी जयंती गुरुवारी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी मराठा सेंटरमधील जवानांनी शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या घोषणांचा जयघोष केला . बुधवारी सकाळी नऊ वाजता शहरातील मराठा इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या शिवतीर्थावर मराठा सेंटरचे ब्रिगेडीयर संतोष कुरूप यांनी शानदार समारंभात अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला. यावेळी मराठा सेंटरचा जवान सुरज कुंद्रे यांने खास जवानांच्या शैलीत शिवचरित्र सांगून उपस्थित जवानांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. ए.बी.एन.बटालियनचे हवालदार संदीप चौगुले आणि सहकारी जवानांनी शिवाजी महाराजांची शूरता आणि इतिहासाचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला. शेवटी उपस्थित जवान जेसीओ आणि अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करून शिवाजी महाराजांना वंदन केले. (प्रतिनिधी)
सरकारी शिवजयंती मिरवणुकीचा फज्जा
बेळगावात कर्नाटक सरकारने साजरा केलेल्या सरकारी पातळीवरील शिवजयंती मिरवणुकीचा फज्जा उडाला. मिरवणूकीत कन्नड भाषेतील यक्षगान आणि रामायण-महाभारतमधील कन्नड कलापथके दाखवून शिवजयंती मिरवणुकीवर कानडी छाप आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक मराठी भाषिकांनी या मिरवणुकीकडे पाठ फिरविली होती. कानडी कलापथक सामील करून शिवजयंती मिरवणुकीवर देखील कानडी प्रभाव असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे.
या सरकारी शिवजयंतीच्या शिवाजी उद्यान येथील कार्यक्रमात खासदार सुरेश अंगडी, आमदार संजय पाटील, महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणूताई मुतगेकरसह काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शिवाजी उद्यानातून शहरभर कलापथक फिरविण्यात आली.