‘शिवाजी’कडून ‘शिवनेरी’चा धुव्वा
By Admin | Updated: December 30, 2016 00:45 IST2016-12-30T00:45:07+5:302016-12-30T00:45:07+5:30
केएसए वरिष्ठ गट फुटबॉल : पीटीएम ‘ब’ची गोल्डस्टारवर मात

‘शिवाजी’कडून ‘शिवनेरी’चा धुव्वा
कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट फुटबॉल साखळी स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने पिछाडीनंतर आघाडी मिळवीत शिवनेरी स्पोर्टस् संघाचा १२-१ अशा गोलफरकाने धुव्वा उडविला; तर पीटीएम ‘ब’ने गोल्डस्टार स्पोर्टस्वर ४-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस् यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभी १३ व्या मिनिटाला शिवनेरी स्पोर्टस्च्या सैद नदाफने गोल करीत संघाचे खाते उघडले. या गोलनंतर मात्र शिवाजी तरुण मंडळाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये २१ व्या मिनिटाला क पिल साठेने गोल नोंदवीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. पाठोपाठ ३१ व्या शिवाजी तरुण मंडळाकडून निखिल जाधवने गोल करीत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत शिवाजी तरुण मंडळ आघाडीवर होते.
उत्तरार्धातील संपूर्ण सामन्यावर शिवाजी तरुण मंडळाने पकड निर्माण केली. यामध्ये या मंडळाकडून ४५ व्या मिनिटाला ऋतुराज पाटीलने, ४८ व्या मिनिटाला निखिल जाधवने, ५३ व्या मिनिटाला डायसने, ५५ व्या मिनिटाला निखिल जाधवने वैयक्तिक दुसरा व संघाचा सहावा गोल केला. ५६ व्या मिनिटाला अनिल साठे याने गोल केला. ६३ व्या मिनिटाला वैभव राऊतने संघाचा आठवा गोल केला. ६६ व्या मिनिटाला कपिल साठेने वैयक्तिक दुसरा व संघाचा नववा गोल केला. ७१ व्या मिनिटाला निखिल जाधवने गोल केला.
७८ व्या मिनिटाला कपिल साठेने वैयक्तिक तिसरा व संघाचा ११ वा गोल केला. पाठोपाठ ८० व्या मिनिटाला ऋतुराज पाटीलने गोल केला. अशा प्रकारे शिवाजी तरुण मंडळाने सामन्यात १२-१ अशा गोलफरकाने भक्कम आघाडी घेतली. ती सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. शिवनेरी संघाकडून नीलेश ढोबळे, रोहित खंचनाळे, अनिकेत सरनाईक, सुमित कदम यांनी चांगला खेळ केला.
पहिला सामना पीटीएम ब विरुद्ध गोल्डस्टार यांच्यामध्ये झाला. सामन्यात पीटीएम ‘ब’ने ४-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. यामध्ये ‘पीटीएम’कडून प्रथमेश दरेकर, शुभम मोहिते, प्रथमेश हेरेकर, रोहन कांबळे यांनी गोल केले, तर गोल्डस्टारकडून सनी सावंतने गोल केला.
केएसए वरिष्ठ गट फुटबॉल साखळी सामन्यात गुरुवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस यांच्यामध्ये झालेल्या सामन्यातील एक क्षण.