राज्यात ‘शिवम’तर्फे गरिबांच्या घरी दिवाळी

By Admin | Updated: November 11, 2015 23:42 IST2015-11-11T23:03:15+5:302015-11-11T23:42:16+5:30

उपक्रमास प्रतिसाद : फराळ, कपडे वाटप

Shiva's Diwali at the poor house in the state | राज्यात ‘शिवम’तर्फे गरिबांच्या घरी दिवाळी

राज्यात ‘शिवम’तर्फे गरिबांच्या घरी दिवाळी

भीमगोंडा देसाई === कोल्हापूर -अठराविश्वे दारिद्र्यामुळे दिवाळी ज्यांच्या घरी साजरी होत नाही, अशा कुटुंबांसाठी शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान (घारेवाडी, ता. कऱ्हाड)तर्फे ‘दिवाळी सर्वांसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाद्वारे कार्यकर्ते राज्यभर गरीब कुटुंंबांना शोधून फराळ, कपडे, साबण, उटणे यांचा लहानसा बॉक्स देत आहेत. हे कोणी दिले हे कळू नये म्हणून संबंधित घरासमोर मध्यरात्री हा बॉक्स ठेवून कार्यकर्ते येत आहेत. यामुळे वंचित, गरिबांच्या कुटुंबांत काही प्रमाणात का असेना, दिवाळीचा प्रकाश पडत आहे.
सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. फटाक्यांचे बार उडत आहेत. सुगंधी अत्तराचा वास दरवळत आहे. बाजारपेठ फुलली आहे. या धांदलीमध्ये गरिबाचा चेहरा अदृश्य झाला आहे. खिशात पैसे नसल्यामुळे त्याला दिवाळी आणि शिमगा हे दोन्ही सण सारखेच वाटत आहेत. दोनवेळच्या जेवणासाठी संघर्ष करून कच्च्याबच्च्यांचा सांभाळ करीत तोे संसाराचा गाडा हाकत आहे. तो आपल्या घरी दिवाळीचा सूर्य कधी उगवणार, याची प्रतीक्षा करीत आहे. प्रत्येक शहरात, गावात, वाड्या-वस्त्यांत अशी अनेक कुटुंंबे असतात.
श्रीमंतांची दिवाळी पाहण्यातच त्यांच्या कुटुंबांतील मुले आनंद मानतात. उसाचा हंगाम सुरू झाल्याने पाठीवर संसार घेऊन मराठवाडा, विदर्भातून ऊसतोड मजुरांनी शेतात झोपडी बांधून तळ ठोकला आहे. ‘दिवाळी म्हणजे काय असते रे भाऊ?’ असे ते मजूर विचारीत असतात. अशा प्रकारे परिस्थितीत व गरिबीमुळे दिवाळी साजरी करू न शकणाऱ्या कुटुंबांचा शोध घेऊन ‘शिवम्’चे कार्यकर्ते मदतीचा हात देत आहेत. गरिबांच्या कुटुंबांतही दिवाळी साजरी व्हावी, यासाठी धडपडत आहेत. फराळ व कपडे गोळा करायचे; साबण, उटणे, सुगंधी तेल खरेदी करायचे किंवा कोणी दिले तर घ्यायचे आणि एका बॉक्समध्ये घालून गरिबांची झोपडी शोधून पोहोच करायचे, असे काम कार्यकर्ते करीत आहेत. यासाठी अनेक लोक स्वत:हून मदत करीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात समीर पाटील, पुणे भागात स्वामीराज भिसे, कऱ्हाड परिसरात मानसिंग पाटील असे राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘शिवम््’चे कार्यकर्ते ऊसतोडणी मजूर, झोपडपट्टी, बेघर वसाहत अशा ठिकाणी जाऊन गरीब कुटुंबांना दिवाळीची भेट देत आहेत. मदत केल्यानंतर प्रचार आणि प्रसार करण्याची प्रवृत्ती फोफावत आहे. त्याला हे कार्यकर्ते जाणीवपूर्वक फाटा देत आहेत.


तीन वर्षांपासून अभियान
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपासून ‘सर्वांसाठी दिवाळी’ आणि प्रत्येक बहिणीसाठी भाऊबीज अभियान राबविले जाते. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीच ‘शिवम्’चे कार्यकर्ते राज्यभर गेल्या चार दिवसांपासून ‘सर्वांसाठी दिवाळी’ अभियान राबवीत आहेत.


गावातील सधन, श्रीमंत कुटुंबांना आवाहन करून फराळ, कपडे, साबण, उटणे असे साहित्य गोळा केले जाते. ते साहित्य एका बॉक्समध्ये घालून गरीब कुटुंबाच्या घरी पोहोच केले जात आहे. ‘शिवम्’चे राज्यभरातील सर्व कार्यकर्ते हे काम करीत आहेत.
- समीर पाटील,
शिवम् कार्यकर्ते
(कोल्हापूर जिल्हा)

Web Title: Shiva's Diwali at the poor house in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.