‘शिवाजी’चा चिवट बचावपटू-
By Admin | Updated: December 30, 2016 00:42 IST2016-12-30T00:42:31+5:302016-12-30T00:42:31+5:30
-संतोष तावडे
_ns.jpg)
‘शिवाजी’चा चिवट बचावपटू-
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संतोषने आपल्या फुटबॉलच्या कौशल्याने मोठे यश मिळविले. शालेय, विद्यापीठ पातळीवरील सर्व स्पर्धा त्याने गाजविल्या. चांगला अॅथलिट असणाऱ्या संतोषने विद्यापीठाच्या संघाचे नेतृत्वही केले. शिवाजी मंडळाचा उत्कृष्ट बचावपटू म्हणून तो प्रसिद्ध आहे.
संतोष दगडू तावडे याचा जन्म ३ मार्च १९७६ रोजी झाला. ४ फूट ११ इंच उंचीच्या मापाच्या फुटबॉल स्पर्धेत तो खंडोबा देवालय संघाकडून सतत असे. याच देवालय संघात टेनिस चेंडूवर तो राईट डिफेन्स या जागेवर तयार झाला.
कोल्हापुरातील सीनिअर संघातील अव्वल खेळाडूंच्या खेळाचा प्रभाव संतोषवर पडला. आपणही मोठ्याप्रमाणे खेळावे असे त्यास वाटू लागले. त्याने महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रवेश मिळविला. वडिलांचे प्रोत्साहन, हायस्कूलमध्ये प्रशिक्षक वणिरे सर, आतकिरे सर, धनाजी सूर्यवंशी, उदय आतकिरे यांची प्रेरणा मिळाली. महाराष्ट्र हायस्कूलच्या संघातून खेळत असताना संतोषची महाराष्ट्र राज्य शालेय संघात निवड झाली. मध्य प्रदेशातील सतना येथे झालेल्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. यामुळे संतोषचा आत्मविश्वास वाढला.
१९९२ साली शिवाजी तरुण मंडळच्या ‘ब’ संघात संतोषला संधी मिळाली. त्यावेळी शिवाजी संघ चांगलाच मजबूत होता. या संघातील त्याची कामगिरी पाहून तीनच वर्षात ‘शिवाजी’च्या ‘अ’ संघात राईट डिफेन्स या जागेवर त्याची निवड झाली. त्याने पुढे तेरा वर्षे या जागेवर खेळून आपल्या संयमी खेळाने मैदाने गाजवली. त्याने स्थानिक स्पर्धा तर गाजवल्याच त्याचबरोबर गडहिंंग्लज, मिरज, सांगली, वर्धा, अकोला, पुणे, मुंबई या ठिकाणी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
संतोषचा खेळ म्हणजे खणखणीत नाणे. उंची असल्याने हेडिंंगचा वापर करून पास देण्यात तो वाक्बगार होता. सर्व प्रकारच्या बॉल कंट्रोललिंगवर ताबा असे. तसेच बॉल ड्रिबलिंग, बॉल व बॉडी टॅकलिंगवर प्रभुत्व होते.
खेळाबरोबर शिक्षणाकडेही त्याने लक्ष दिले. कॉलेजस्तरावरही शिवाजी विद्यापीठाच्या झोन, इंटर झोन, वेस्ट झोन या स्पर्धा खेळण्याची संधी त्यास मिळाली. शिवाजी विद्यापीठ संघात त्याची वेस्ट झोन स्पर्धेकरिता चार वेळा निवड होऊन एक वेळ त्याने कर्णधारपद भूषविले आहे. भारताच्या अनेक भागात त्याला आपल्या खेळाचे प्रदर्शन करता आले. संतोष केवळ फुटबॉलपटू नव्हता, तर तो चांगला अॅथलिटही होता. महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवरील अनेक अनेक बक्षिसे त्याने मिळविली आहेत.
एकदा पी. टी. एम. आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यात चुरशीचा सामना सुरू होता. स्टेडियम पूर्ण भरले होते. पूर्वार्धात गोलफरक कोराच राहिला. उत्तरार्धात संतोषच्या कॉर्नर किकवर धनाजी सूर्यवंशी याने हेडद्वारे उत्तम गोल केला. शिवाय संतोषने वैयक्तिक दुसरा गोल केला व हा सामना ‘शिवाजी’ने ३- 0 ने जिंंकला. या सामन्यातील कामगिरी त्याला कायमचा आनंद देऊन गेली.
संतोष सामान्य कुटुंबातील मुलगा. वर्गणी जमवून खेळासाठी लागणारे साहित्य कसे तरी जमवायचे. वडील फुटबॉल वेडे असल्याने मुलाच्या फुटबॉल छंदापायी फार खस्ता खाल्ल्या आणि मुलाची फुटबॉलची आवड पूर्ण केली. भांडणे, मारामाऱ्या, पाडापाडी, धसमुसळा खेळ याचा स्पर्शही त्याला झाला नाही. सध्या त्याचा हॉटेल आणि कॅटरिंगचा व्यवसाय भरभराटीत चालला आहे. या व्यवसायातही फुटबॉलच्या लोकप्रियतेमुळे चांगलाच फायदा त्याला होत आहे.
(उद्याच्या अंकात : अजित पाटील)
प्रा. डॉ. अभिजित वणिरे