शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद शक्य

By Admin | Updated: November 21, 2015 00:23 IST2015-11-20T23:43:25+5:302015-11-21T00:23:00+5:30

पक्षवाढीसाठी निवड : पालकमंत्रीपदही मिळण्याची शक्यता; भाजपच्या कोअर कमिटी सूत्रांकडून दुजोरा

Shivajirao Naik as a Cabinet Minister | शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद शक्य

शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद शक्य

संजय घोडे-पाटील -- कोकरूड--सांगली जिल्ह्याचा मंत्रिपदाचा अनुशेष शिराळ्याचे आ. शिवाजीराव नाईक यांच्यारूपाने भरून निघत असल्याचे संकेत भाजपच्या कोअर कमिटीतील वरिष्ठ सूत्रांकडून मिळाले. येत्या शुक्रवार, दि. २७ रोजी शपथविधी होण्याचेही संकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असून, या वृत्ताला भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही दुजोरा दिला आहे.
आ. शिवाजीराव नाईक सांगली जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते असून, चार वेळा आमदार व युती शासनाच्या कालावधित राज्यमंत्रीपद त्यांनी भूषविले आहे. स्वच्छ चारित्र्य, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. शिराळ्यापासून जतपर्यंत कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या मागे उभी राहू शकते, हे भाजपच्या सर्व वरिष्ठांनी ओळखले असून, पक्षवाढीच्यादृष्टीने त्यांची निवड योग्य असल्याचे बोलले जात आहे. पक्षात असणारे विरोधक हे गेल्या वर्षभरापासून त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यातही यशस्वी होत होते. आता मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत नाईक यांनी मंत्रिपदाची बाजी मारली आहे.
भाजपचे खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी नाईक यांचे ज्येष्ठत्व या पातळीवर नाईक यांचेच नाव मंत्रिपदासाठी योग्य असल्याचा गोपनीय अहवाल पक्षाला दिला आहे. पक्षातील दुसरे ज्येष्ठ आ. सुरेश खाडे हे भाजपचे निष्ठावंत असून एक वेळा त्यांनी जतमधून अपक्ष म्हणून विजय मिळविला आहे. तसेच दोन वेळा पक्षाच्या तिकिटावर यश संपादन केले आहे. त्यांना हे यश वेगवेगळ्या परिस्थितीत व घटना या अनुषंगाने जरी मिळाले असले तरी, त्यांचा जिल्ह्याचा आवाका व अनुभव त्यादृष्टीने कमी आहे.

गडकरींकडून आश्वासनाची पूृर्तता शक्य
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कामेरी (ता. वाळवा) येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, शिवाजीरावांना निवडून द्या, मी त्यांना कॅबिनेट मंत्री करतो, असे आश्वासन जाहीर सभेत दिले होते. याला वर्षाचा कालावधी लोटला असून आता तिसऱ्यांदा विस्तार होताना या शब्दाची पूर्तता होत आहे.

कोण काय म्हणाले?
शिवाजीराव नाईक व मिरजेचे सुरेश खाडे या दोन आमदारांपैकी एकाला संधी मिळणार आहे. ज्यांना ही संधी मिळणार, त्याला कोअर कमिटी शपथविधीच्या आदल्या दिवशी निमंत्रण देणार आहे. त्याचवेळी जिल्ह्याला मंत्री कोण हे स्पष्ट हाईल.
- राजाराम गरूड, भाजप जिल्हाध्यक्ष


निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळाले असून, आम्ही सर्वचजण ज्याला हे पद मिळेल त्याच्या पाठीशी उभे राहून पक्षाची ताकत वाढविणार आहोत. एक खासदार व चार आमदार यापुढेही आम्ही एकदिलाने काम करणार आहोत.
- आ. शिवाजीराव नाईक

Web Title: Shivajirao Naik as a Cabinet Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.