शिवाजी विद्यापीठाचे एनआयआरएफ रँकिंग ‘जैसे-थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:57+5:302021-09-10T04:30:57+5:30

कोल्हापूर : नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कचे (एनआयआरएफ) मानांकन केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरूवारी ऑनलाईन जाहीर केले. त्यातील ...

Shivaji University's NIRF ranking 'as is' | शिवाजी विद्यापीठाचे एनआयआरएफ रँकिंग ‘जैसे-थे’

शिवाजी विद्यापीठाचे एनआयआरएफ रँकिंग ‘जैसे-थे’

कोल्हापूर : नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कचे (एनआयआरएफ) मानांकन केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरूवारी ऑनलाईन जाहीर केले. त्यातील पहिल्या शंभर विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये यावर्षीदेखील शिवाजी विद्यापीठाला स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे हे मानांकन जैसे-थे राहिले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे देशातील विद्यापीठांच्या यादीत १०१ - १५० आणि सर्व शैक्षणिक संस्थांच्या यादीतील १५१ - २०० या रँकबँडमध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे.

अध्यापन-अध्ययन पद्धती, निधी खर्चाचे प्रमाण, रोजगार उपलब्धता, विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेच्या कॅम्पसवरील परदेशातील विद्यार्थ्यांचे प्रमाण, पेटंट, आदी विविध निकषांच्या आधारे देशातील सर्व विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ‘एनआयआरएफ’ रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. त्यात विद्यापीठ, अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन, विधी (लॉ), वैद्यकीय, आर्किटेक्चर या गटनिहाय मानांकनाचा समावेश आहे. त्यामध्ये विद्यापीठाला गेल्यावर्षी इतके मानांकन मिळाले आहे. विद्यापीठाने सन २०१५-१६मध्ये ‘एनआयआरएफ’ मूल्यांकनामध्ये देशात २८ वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतरच्या दुसऱ्यावर्षी विद्यापीठाने या मूल्यांकनासाठी अर्ज केला नव्हता. सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठाने अर्ज केला. त्यानंतर मूल्यांकनाच्या यादीतील १०१-१५० रँकबँडमध्ये विद्यापीठाला स्थान मिळाले. त्यामध्ये यावर्षीही बदल झाला नाही.

मानांकन वाढीसाठी प्रयत्न करणार

गेल्यावर्षी इतकेच ‘एनआयआरएफ’ मानांकन विद्यापीठाला मिळाले आहे. प्राध्यापकांच्या रिक्त जागा, कॅम्पसवरील परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण या निकषांमध्ये आम्ही थोडे कमी पडलो आहोत. संशोधनात चांगली कामगिरी आहे. पुढील तीन वर्षे नियोजनबद्ध कार्यरत राहून मानांकन वाढीसाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.

डी. वाय. पाटील सोसायटीचा समावेश

या मानांकनातील शैक्षणिक संस्थांच्या गटातील १५१-२०० रँकबँडमध्ये कोल्हापुरातील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचा समावेश आहे. फार्मसी कॉलेजच्या गटातील ७६-१०० रँकबँडमध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचा, तर वैद्यकीय गटातील कऱ्हाड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिमड (अभिमत) युनिव्हर्सिटीचा ४७.११ गुणांसह समावेश आहे.

Web Title: Shivaji University's NIRF ranking 'as is'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.