शिवाजी विद्यापीठाचा माहितीपट तयार
By Admin | Updated: November 7, 2014 23:33 IST2014-11-07T23:23:29+5:302014-11-07T23:33:52+5:30
‘मास कम्युनिकेशन’चा उपक्रम : ‘सुवर्णमहोत्सवी’ वाटचालीची तेरा मिनिटांची सफर

शिवाजी विद्यापीठाचा माहितीपट तयार
कोल्हापूर : अवघ्या १३ मिनिटांत शिवाजी विद्यापीठाची ५० वर्षांतील वाटचालीची सफर घडवून आणण्याची किमया ‘मास कम्युनिकेशन’च्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांनी विभागात शिकविण्यात आलेला अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिकांच्या जोरावर विद्यापीठाचा इंग्रजी भाषेतील माहितीपट पहिल्यांदाच साकारला आहे.
‘नॅक’ समिती भेटीच्या अनुषंगाने ‘मास कम्युनिकेशन’ने विद्यापीठाचा माहितीपट तयार करण्याचा निर्णय घेतला. या विभागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ‘फिल्ममेकिंग’ची रितसर माहिती नव्हती. शिकलेली थिअरी आणि पाहिलेली प्रात्यक्षिके यांच्या बळावर त्यांनी काम सुरू केले. ‘मास कम्युनिकेशन’च्या समन्वयक डॉ. नीशा पवार, डॉ. वासंती रासम, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी १३ मिनिटांचा माहितीपट साकारला आहे. त्यात विद्यापीठाची स्थापना, वर्तमान स्थिती, शैक्षणिक, संशोधन, कला व क्रीडा, आदी क्षेत्रांतील कामगिरी तसेच भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला आहे.
माहितीपटाची संहिता अनिल देशमुख यांनी लिहिली असून, प्रसाद ठाकूर यांच्या साथीने त्यांनी दिग्दर्शन केले. निर्भय उलस्वार या विद्यार्थ्याने उत्कृष्ट छायाचित्रण केले. जगदीश गुरव यांनी संकलन केले. सागर सावंत आणि राहुल गडकर यांनी कॅमेरा सहायक, मोनिका जसुजाने नॅरेशन, तर यशवंत वणिरे यांनी ध्वनिसंकलन केले. धनाजी सुर्वे, शंकर कांबळे, सुष्मिता राऊत, ऐश्वर्या जाधव, पूजा करके, गणेश कांबळे यांनी संशोधनाची आणि योगेश चौगुले, तेजस्विनी कुंभार, त्रिरत्न कांबळे यांनी व्यवस्थापनाची बाजू सांभाळली. जयप्रकाश पाटील, प्रिया जाधव, श्वेता किल्लेदार, शीतल देसाई, सद्दाम शेख, अश्विनी पाटील, गणेश अंबराळे, अतुल फराटे यांच्यासह पत्रकारिता व संवादशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने त्यांना सहकार्य केले. ‘नॅक’ समितीसमोर या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले आहे शिवाय माहितीपट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे. विद्यापीठाची ओळख करून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा स्वरूपातील नवमाध्यमाचा वापर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
कमी वेळेत विद्यापीठाचे समग्र दर्शन घडविण्याचे आव्हान होते. मात्र, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाप्रती असलेल्या आत्मियतेतून ते सहजपणे पेलले. इंग्रजी भाषेतील विद्यापीठाचा हा पहिलाच माहितीपट आहे. तांत्रिक स्वरूपातील अपुरी साधने असतानाही एक चांगला माहितीपट बनविण्यात आम्हाला यश आले. त्यासाठी विद्यापीठाचे प्रशासन, विविध अधिविभाग, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- डॉ. नीशा पवार,
समन्वयक, मास कम्युनिकेशन
कमी वेळेत विद्यापीठाचे समग्र दर्शन घडविण्याचे आव्हान होते. मात्र, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाप्रती असलेल्या आत्मियतेतून ते सहजपणे पेलले. इंग्रजी भाषेतील विद्यापीठाचा हा पहिलाच माहितीपट आहे. तांत्रिक स्वरूपातील अपुरी साधने असतानाही एक चांगला माहितीपट बनविण्यात आम्हाला यश आले. त्यासाठी विद्यापीठाचे प्रशासन, विविध अधिविभाग, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- डॉ. नीशा पवार,
समन्वयक, मास कम्युनिकेशन