शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत
By Admin | Updated: April 8, 2015 00:31 IST2015-04-07T23:59:22+5:302015-04-08T00:31:21+5:30
नेताजी चषक फुटबॉल : फुलेवाडी संघावर ‘सडनडेथ’वर मात

शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत
कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या नेताजी तरुण मंडळ आयोजित फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने फुलेवाडी संघावर सडनडेथवर मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाकडून आकाश भोसलेने फुलेवाडी संघाची बचावफळी भेदत गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या जवळून गेल्याने त्यांची संधी हुकली.
पाठोपाठ शिवाजी तरुण मंडळाकडून चिंतामणी राजवाडे, आकाश भोसले, वैभव राऊत, तेजस शिंदे, स्वप्निल पाटील, तर ‘फुलेवाडी’कडून मोहसीन बागवान, अभिजित तेवरे, रोहन कांबळे, मंगेश दिवसे यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समन्वयाअभावी त्यांच्या चढाया फोल ठरल्या. मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता. उत्तरार्धातसुद्धा हीच स्थिती राहिल्याने संपूर्ण वेळ सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत राहिला. मुख्य पंचांनी सामन्याचा निकाल लावण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यामध्ये शिवाजी तरुण मंडळाकडून वैभव राऊत, संदीप पोवार, योगेश सरनाईक, अनिरुद्ध शिंदे, आकाश भोसले यांनी, तर ‘फुलेवाडी’कडून तेजस जाधव, रोहित साठे, रोहित मंडलिक, निखिल खाडे, सुशांत अतिग्रे यांनी प्रत्येकीएक गोल केल्यामुळे सामना ५-५ अशा गोलफरकाने बरोबरीत राहिला. त्यामुळे सडनडेथवर सामन्याचा निकाल लावण्याचे ठरले.
त्यामध्ये ‘शिवाजी’कडून सूरज शेळके याने अचूक गोल केला, तर फुलेवाडी संघाकडून सूरज शिंगटे याने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेल्याने शिवाजी तरुण मंडळाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. (प्रतिनिधी)