पेठेतील ‘शिवाजी मंदिर’ कात टाकणार

By Admin | Updated: August 8, 2014 00:38 IST2014-08-07T23:54:23+5:302014-08-08T00:38:36+5:30

सर्वपक्षीय नेतेमंडळी सरसावली : नूतनीकरणानंतर विविध उपयोग करणार

'Shivaji Mandir' will be cut off in Peth | पेठेतील ‘शिवाजी मंदिर’ कात टाकणार

पेठेतील ‘शिवाजी मंदिर’ कात टाकणार


सचिन भोसले -कोल्हापूर.  गरिबाचे लग्न असो वा एखादी सामाजिक सभा असो; चटकन सर्व शिवाजी पेठकरांच्या डोळ्यांसमोर येते ते शिवाजी मंदिर. ‘शिवाजी पेठेची शान’ असलेल्या ही वास्तू काळाच्या ओघात जर्जर होऊ लागली आहे. या वास्तूचे नूतनीकरण करणे काळाची गरज बनली आहे. याकरिता पक्षीय भेद विसरून सर्व मंडळी पुन्हा एकदा या मंदिराचा कायापालट करण्यासाठी सरसावली आहेत.
आजच्या घडीला लग्नासाठी हॉल भाड्याने घ्यायचा म्हटले की, वधू असो वा वर; यांच्या पालकांना अक्षरश: घाम फुटतो. मात्र, शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळचे शिवाजी मंदिर हे एकमेव सभागृह आहे. ज्यामध्ये अगदी नाममात्र शुल्कात लग्न, बारसे, जाऊळ, आदी कार्यक्रम आजही होतात.
अशा सर्वसामान्यांच्या जीवनाशी घट्ट नाळ जुळलेल्या या मंदिरच्या या इमारतीला स्लॅबला गळती लागली आहे. याशिवाय खिडक्या, दारे जर्जर झाली आहेत. त्यामुळे या वास्तूचे नूतनीकरण करणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी रामभाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली.
त्यामध्ये अजित खराडे, सदुभाऊ शिर्के, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेश जाधव, लालासाहेब गायकवाड, मोहन साळोखे, चंद्रकांत यादव, केशवराव जाधव, माजी नगरसेवक अजित राऊत, अ‍ॅड. अशोकराव साळोखे व पेठेतील सर्व तालीम संस्थांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी अशी नूतनीकरण कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
यामध्ये मंदिर नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. नूतनीकरणानंतर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकरीता प्रशिक्षण वर्ग, तसेच महालक्ष्मी दर्शनाकरीता आलेल्या भाविकांना अल्पदरात निवासाची सोय उपलब्ध करण्याचा मानस आहे.

जनतेकडून उभारणी
१९३२ मध्ये फुटबॉल आणि मर्दानी खेळांसाठी पेठेचे अस्तित्व असावे. याकरीता शिवाजी तरुण मंडळाची स्थापना दिनकरराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नोंदणी केली. १ मे १९६४ रोजी शिवाजी मंदिरची पायाभरणी केली. त्यामध्ये वसंतराव पंदारे, पी.जी.साठे, सखारामबापू खराडे, अशोक साळोखे, जनार्दन सूर्यवंशी, आनंदराव साळोखे, संभाजी साळोखे यांनी पुढाकार घेतला. यावेळी आम जनतेच्या मदतीने ही वास्तू उभारण्यात आली.

श्राद्ध, दिवस, साखरपुडा, लग्न, बारसे, जावळ याकरीता केवळ ५०० ते १००० रुपयांत उपलब्ध होणाऱ्या व शिवाजी पेठेची नाळ जुळलेल्या या वास्तूची जपणूक करण्यासाठी नुतनीकरण करणे आवश्यक बनले आहे. त्यानुसार २५ लाखांपेक्षा अधिक खर्च नूतनीकरणसाठी येणार आहे.
- महेश जाधव, सचिव,
नूतनीकरण कृती समिती

Web Title: 'Shivaji Mandir' will be cut off in Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.