शिवाजी बँकेचा परवाना रद्द होणार ?
By Admin | Updated: June 15, 2014 01:53 IST2014-06-15T00:55:43+5:302014-06-15T01:53:28+5:30
गडहिंग्लजमध्ये खळबळ : ‘आरबीआय’ची कारवाई सुरू

शिवाजी बँकेचा परवाना रद्द होणार ?
गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील श्री शिवाजी सहकारी बँकेचा बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. परवान्याला पाचव्यांदा मिळालेली मुदतवाढ २४ आॅक्टोबर २०१४ पर्यंत असतानाही कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने बँकिंगचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परवाना रद्द झाल्यास बँक अवसायनात निघाणार असून ठेवीदार व कर्मचारी उघड्यावर पडणार आहेत. त्यामुळे गडहिंग्लजसह जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दुपारी बँक बचावासाठी हितचिंतकांची बैठक सुरू असतानाच मुंबईहून आलेल्या ‘आरबीआय’च्या दोन अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत बँकेत ठाण मांडून आवश्यक कागदपत्रे व ताळेबंद आदींची माहिती घेतली. त्यांच्याकडून दुजोरा मिळाल्यामुळे परवाना रद्दची कारवाई अटळ आहे.
सुरुवातीला बहुजन समाजाची बँक म्हणून नावलौकिक झालेली ही बँक संचालकांचा गैरकारभार व गैरव्यस्थापनामुळे अडचणीत आली. बेकायदेशीर कर्जवाटपामुळे कर्जवसुलीवर परिणाम झाल्यामुळे मुदत संपलेल्या ठेवी वेळेवर परत देता आल्या नाहीत. ठेवीदार कृती समितीच्या आंदोलनामुळे बँकेवर प्रशासक आले.
दरम्यान, ठेवीदार व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रशासकांनी बँकेच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न केले. मात्र, काही कर्मचारी न्यायालयात गेल्यामुळे त्यात व्यत्यय आला. त्याचाच फायदा घेऊन काही मंडळींकडून बँक वाचविण्याच्या नावाखाली विलीनीकरणालाच खो घालण्याचा प्रयत्न झाला. माजी संचालक, प्रशासक व कर्मचारी यांच्यातील विसंवादामुळे विलीनीकरणाची प्रक्रियादेखील लांबत गेली. त्यामुळे बँकिंग परवान्याला मुदतवाढ मिळूनही बँकेच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परवाना रद्द झाल्यास बँक अवसायनात निघाल्यास ठेवीदार व कर्मचारी वाऱ्यावर पडणार आहेत. त्यामुळे ‘आरबीआय’च्या कारवाईकडे गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवाजी बँकेच्या हितचिंतकांची एक व्यापक बैठक झाली. बँकेचा परवाना आणि बँक वाचवण्यासाठी सर्व ताकदीनिशी अजूनही प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अमर चव्हाण होते.
बैठकीस नगरसेवक किरण कदम, नितीन देसाई, अरुण कलाल, तानाजीराव मोहिते, बचाराम मोहिते, जयसिंग चव्हाण, बाबासाहेब पाटील, बाळेश नाईक, शशिकांत चोथे आदींसह माजी संचालक व हितचिंतक उपस्थित होते. (प्रतिनिधी)