‘शिवाजी,’ ‘पाटाकडील’ची आगेकूच
By Admin | Updated: April 3, 2015 23:58 IST2015-04-03T23:29:57+5:302015-04-03T23:58:34+5:30
नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा :पॅट्रियट, दिलबहार (ब) पराभूत

‘शिवाजी,’ ‘पाटाकडील’ची आगेकूच
कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार (ब)चा, तर दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने पॅट्रियटचा ५-० असा दणदणीत पराभव करीत नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली. ‘पाटाकडील (अ)’च्या हृषिकेश मेथे-पाटील व ‘शिवाजी’च्या आकाश भोसलेची हॅट्ट्रिक लक्षणीय ठरली.
शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळ व दिलबहार (ब) यांच्यात सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून ‘शिवाजी’कडून वैभव राऊत, अनिरुद्ध शिंदे, आकाश भोसले, स्वप्निल पाटील, चिंतामणी राजवाडे यांनी चढाया करीत दिलबहार (ब)वर वर्चस्व निर्माण केले. ३२ व्या मिनिटास ‘शिवाजी’च्या आकाश भोसलेने गोल करीत १-० अशी आघाडी मिळविली. दिलबहार (ब)कडून शशांक माने, लखन मुळीक, स्वप्निल साळोखे, आदित्य लाड, शुभम सरनाईक यांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला.
उत्तरार्धात सामन्यावर शिवाजी तरुण मंडळाचेच वर्चस्व होते. शिवाजीकडून योगेश सरनाईकच्या पासवर सूर्यजित घोरपडे याने ७० व्या मिनिटास दुसरा गोल नोंदवीत २-० अशी आघाडी घेतली. ७७, ८० आणि ८२ व्या मिनिटाला ‘शिवाजी’च्या आकाश भोसले याने हॅट्ट्रिक साधत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसरा सामना पाटाकडील (अ) व पॅट्रियट स्पोर्टस यांच्यात झाला. पाटाकडील (अ)ने तिसऱ्या मिनिटापासून अक्षय मेथे-पाटीलच्या पासवर रूपेश सुर्वेने पहिला गोल नोंदवीत सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. पाटाकडील (अ)च्या आक्रमणापुढे पॅट्रियटचा बचाव तोकडा पडला. १७ व्या मिनिटास पाटाकडील (अ)कडून सैफ हकीमच्या पासवर उत्सव मरळकरने गोल नोंदवीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. पाटाकडील (अ)कडून हृषिकेश मेथे-पाटील याने ३५, ४० व ५६ मिनिटास सलग तीन गोल नोंदवीत ५-० अशी आघाडी घेतली.