हातकणंगलेत शिवसेनेचे गीत; पुन्हा सुजित

By Admin | Updated: October 20, 2014 00:42 IST2014-10-20T00:08:50+5:302014-10-20T00:42:41+5:30

आवळेंची पराभवाची हॅट्ट्रिक..काँग्रेसचा डावच मोडीत काढला

Shiv Sena's song in Hathkangala; Regenerate again | हातकणंगलेत शिवसेनेचे गीत; पुन्हा सुजित

हातकणंगलेत शिवसेनेचे गीत; पुन्हा सुजित

दत्ता बीडकर / आयुब मुल्ला ल्ल हातकणंगले
शिवसेनेचे गीत गात, हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघात पुन्हा सुजितच हे आमदार सुजित मिणचेकर यांनी एकतर्फी मैदान मारत दाखवून दिले. मिणचेकर यांनी भगवा फडकावत आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार जयवंतराव आवळे यांचा तब्बल २९ हजार ३७० मतांनी पराभव केला. काँग्रेस दुसऱ्या स्थानी, तर जनसुराज्य तिसऱ्या स्थानी फेकला गेला. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असतानाही राष्ट्रवादीचा उमेदवार चार हजार मतांचा आकडाही पार करू शकला नाही. या निकालामुळे कोण कोणाबरोबर याचे गणित उलगडले आहे. शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर विजयी घोषित होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
आघाडीची बिघाडी आणि महायुतीचा काडीमोड या घटनांमुळे या मतदारसंघात काट्याची टक्कर होईल, अशी स्थिती होती. मात्र, आज झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेने एकतर्फी हा गड राखत दुसऱ्यांदा या मतदारसंघात भगवा फडकविला.
हातकणंगले शासकीय धान्य गोदामामध्ये आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी धिम्या गतीने सुरू होती. इतर मतदारसंघांत पाच फेऱ्या पूर्ण झाल्या, तरी हातकणंगलेत पहिलीच फेरी सुरू होती. १४ टेबलांवर मतमोजणी सुरू होती. एकूण २३ फेऱ्यांमध्ये २ लाख २३ हजार मते मोजणीसाठी यंत्रणा सुरू झाली. सकाळी नऊ वाजता पहिली फेरी पूर्ण झाली. पहिल्या फेरीपासूनच मिणचेकर आघाडीवर होते. पहिल्या फेरीत जनसुराज्यचे राजीव आवळे यांच्यापेक्षा २११ मतांनी आघाडी घेणारे मिणचेकर दुसऱ्या फेरीतही १७२८ मतांनी आघाडीवर राहिले. पहिल्या व दुसऱ्या फेरीत जयवंतराव
आवळे तिसऱ्या स्थानी होते. तिसऱ्या फेरीत मिणचेकर यांनी काँग्रेसचे जयवंतराव आवळे यांच्यापेक्षा
१८३६ मते जादा मिळवीत तिसऱ्या फेरीत ३०८७ मतांची आघाडी घेतली.
चौथ्या फेरीपासून २३ फेरीअखेर काँग्रेस आणि शिवसेना असा
दुरंगी सामना रंगला आणि प्रत्येक फेरीत शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांनी एक हजार ते
बाराशे मतांची आघाडी घेत मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निर्णायक २९,३७० मते मिळवीत विजयी आकडा पार केला.

आवळेंची पराभवाची हॅट्ट्रिक
२००४ मध्ये तत्कालीन मंत्री असताना जयवंत आवळे यांचा जनसुराज्यचे राजीव आवळे यांनी पराभव केला होता. २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. मिणचेकर यांच्याकडून २९,३७० मतांनी पराभूत झाले, तर त्यांचे पुत्र राजू आवळे २००९च्या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे आवळे यांच्या घराण्याची पराभवाची हॅट्ट्रिक झाली.

माने गटाकडून विजयोत्सव
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत तसेच गत विधानसभा निवडणुकीतही आघाडी असल्यामुळे माजी खासदार निवेदिता माने गटाला गुलाल उधळता आला नाही. परंतु, या निवडणुकीत मात्र डॉ. मिणचेकर यांच्या विजयात आपला सहभाग नोंदवीत कार्यकर्त्यांनी अखेर गुलाल लावला व विजयोत्सव साजरा केला.

काँग्रेसचा डावच मोडीत काढला
कॉँग्रेसमध्ये आवाडे-महाडिक-आवळे यांचे ऐक्य झाले; परंतु आवाडे यांना मानणाऱ्या हुपरी परिसरातील १३ गावांत तसेच महाडिक यांच्या शिरोली गावातूनच सेनेने मताधिक्य घेत कॉँग्रेसचा डावच मोडीत काढला.

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र
निलेवाडी, अंबपवाडी, भादोले, भेंडवडे व माले वगळता काँग्रेसला कोणत्याही गावांमध्ये मताधिक्य मिळाले नाही. ५८ गावांपैकी ५३ गावांमध्ये शिवसेनेने आघाडी घेतली. माणगाववाडी, साजणी, तिळवणी, रुई, इंगळी, पट्टणकोडोली, तळंदगे, हुपरी, रेंदाळ, रांगोळी, जंगमवाडी या गावांनी यावेळीही सेनेला आघाडी दिली.


शेतकरी संघटनेला
अल्प मते
या संघटनेचे उमेदवार स्वत:च्या गावात २०च्या वर सुद्धा मताधिक्य घेऊ शकले नाहीत. इतर गावांतसुद्धा दोन, तीन, आकड्यांवरतीच समाधान मानावे लागले. त्यामुळे संघटनेची किंबहुना महायुतीची मते कुठे गेली, असा प्रश्न अनेकजण करीत होते.

Web Title: Shiv Sena's song in Hathkangala; Regenerate again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.