डेंग्यूवर उपाययोजनेसाठी शिवसेनेचे पालिका सभेत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:03+5:302021-07-01T04:17:03+5:30
इचलकरंजी : कोरोना महामारीमुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच डेंग्यू आजाराने थैमान घालणे सुरू केले आहे. त्यावर नगरपालिकेने ...

डेंग्यूवर उपाययोजनेसाठी शिवसेनेचे पालिका सभेत आंदोलन
इचलकरंजी : कोरोना महामारीमुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच डेंग्यू आजाराने थैमान घालणे सुरू केले आहे. त्यावर नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी करत शिवसेनेने बुधवारी नगरपालिका सभेत नगराध्यक्षांना घेराव घालून शंखध्वनी करत आंदोलन केले. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरात जून महिन्यात तब्बल १६४ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते. त्यामुळे नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना सुरू कराव्यात, या मागणीसाठी शिवसेनेने मोर्चा काढून नगरपालिकेच्या नाट्यगृहात सुरू असलेल्या सभेमध्ये गेले. तेथे शंखध्वनी करत नगराध्यक्षांना घेराव घालून ठिय्या मारला. जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. आंदोलनात नगरसेवक रवींद्र माने, महादेव गौड, उमा गौड, भाऊसाहेब आवळे, रवींद्र लोहार, धनाजी मोरे, शिवाजी पाटील, विद्याधर पोवार, दत्तात्रय साळोखे, आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.